बरेचदा लोक सोशल एक्सपेरिमेंट्स करतात. म्हणजे एखाद्या परिस्थितीत कोण कसं वागतं याची नमुना चाचणी. प्रत्येकजण आपापल्या स्वभावाप्रमाणे वेगळा वागतो आणि व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळं अशा प्रयोगांचं पुढं काय होतं ते करणारेच जाणोत. सध्या एक असाच प्रयोग चर्चेत आहे. हा प्रयोग केला गेला एका १२ वर्षांच्या मुलावर. नक्की या प्रयोगाचं स्वरूप काय होतं आणि त्याचे निष्कर्ष कसे आले हे पाहूयात.
५ सेकंदांत काहीही फुकट मिळत असेल तर १२ वर्षांचा मुलगा काय काय घेईल??


एका दुकानात हा जवळपास 12 वर्षं वयाचा मुलगा गेला. दुकानदराने त्याला काही गणिताचे प्रश्न विचारले, त्याने बरोबर उत्तर दिल्यावर त्याला ५ सेकंद देण्यात आले होते. या 5 सेकंदात त्याला दुकानातून आवडेल ती गोष्ट उचलायची होती. कुठल्याही १२ वर्षांच्या मुलाला अशी संधी मिळाल्यास तो चॉकलेट, आईसक्रीम किंवा इतर जंक फूड निवडणार असाच अंदाज कोणीही लावेल. पण हा गडी चांगलाच फिटनेस फ्रिक निघाला. त्याने मोजकेच जंक फूड निवडले आणि केळी, अवाकॅडो, कांदे अशा गोष्टी निवडल्या.
हा सगळा प्रकार दुकानदाराने कॅमेऱ्यात शूट केला. हा व्हिडीओ वायरल झाल्यावर लोकांना चांगलाच धक्का बसलेला पाहायला मिळत आहे. विडिओच्या शेवटी तो ऍपलचे एयरपॉड देखील उचलताना दिसत आहे. यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की "हा लहान मुलगा स्वताला खायला काय आवडेल यापेक्षा घरी काय घेऊन जाता येईल जेणेकरून आपल्या कुटुंबाला देखील या गोष्टींचा उपयोग होईल याचा विचार करत होता.:
हे घटना नक्की कुठे घडली हे कळत नाही, पण त्याने काही फरक पडू नये. या वयाचा एक मुलगा कसा वागू शकतो याचं हे पुरेसं प्रातिनिधिक उदाहरण आहे. लहान मुलांना काय चांगले काय वाईट याची समज दिली तर ते नक्कीच चांगल्या वाईटात फरक करून चांगले तेच निवडतात हेच या विडिओच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे.