अनोखं राहणीमान, भाषा, परंपरा, खाद्य संस्कृती आणि कपडे यामुळे अनेक देश कुतूहलाचा विषय ठरतात. अश्याच एका गावाविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे ठिकाण आहे ब्रिटनच्या ब्रिकेटवुड जवळ असलेलं ‘स्पीलप्लाट्ज’ नावाचं गाव. स्पीलप्लाट्जचं वैशिष्ठ्य म्हणजे या गावातले लहान-मोठे, म्हातारे, तरुण, स्त्री-पुरुष कोणीही कपडे घालत नाहीत. ऐकायला थोडं अश्लील वाटेल पण या मागचं कारण थोडं वेगळं आहे मंडळी.
निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाशी एकरूप होण्यासाठी अशी जीवन पद्धती अंगिकारली असल्याचं इथे राहणारे लोक म्हणतात. गेल्या ८५ वर्षापासून इथले अबाल वृद्ध कपडे न घालता विवस्त्र जीवन जगतायत. गावची ही प्रथाच आहे म्हणा ना. या गावचा शोध १९२९ साली इसुल्ट रिचर्डसन लावला होता. त्यानंतरच इथल्या लोकांनी विवस्त्र जीवन जगण्याचं ठरवलं असल्याचं म्हटलं जातं.
अशा राहणीमानामुळे इथले लोक आधुनिक जगापासून तुटलेले आहेत का ? तर तस अजिबात नाही. या गावात पब, बंगले, स्विमिंग पूल वगैरे सगळं अत्याधुनिक आहे मंडळी.
आता तुम्ही म्हणाल की थंडीतही विवस्त्र कसे राहत असतील हे लोक ? तर त्याचं असं आहे की थंडी मध्ये कपडे घालण्याची या लोकांना मुभा देण्यात आली आहे.
इथे जर तुम्हाला पर्यटक म्हणून जायचं असेल तर तुम्हालाही इथे विवस्त्रचं राहावं लागेल. या गावात अनेक पर्यटक येत असतात आणि भाड्याने घर घेऊन राहतात. इथे जरी बाहेरची माणसे येऊन विवस्त्र राहत असली तरी गावाच्या नियमांचे त्यांना काटेकोर पालन करावे लागते.
आजच्या आधुनिक आणि फॅशनेबल जगात असं वेगळं राहणीमान आश्चर्याचीच बाब आहे. नाही का ?

