जगात काहीही घडू शकतं. फक्त आपण ते तसं घडवून आणू शकतो यावर तुमचा विश्वास हवा. नुकताच एका बाईंनी विमा कंपनीवर केलेला खटला जिंकला आहे. या खटल्याला 'बादरायणी संबंध'च फक्त म्हणता येईल. आता बादरायणी संबंध म्हणजे 'तुमच्या आणि माझ्या गाडीचे चाक बोरीच्या लाकडाचे आहे, म्हणून आपण नातेवाईक आहोत आणि तुम्ही माझं आदरातिथ्य करा' अशी एक लोककथा सांगितली जाते त्यातला तो संबंध. वाचूया मग या बाई, विमा कंपनी, खटलला आणि ४० कोटींच्या भरपाईची काय भानगड आहे!!
गोष्ट आहे अमेरिकेतील मिसौरी या राज्यातली. ही घटना २०१७ सालची असली तर खटल्याचा निकाल आता लागला आहे. बाईंकडे ह्युंदाईची जेनेसीस नावाची कार होती. कारचे अनेक उपयोग असले तरी बाईंनी कारचा अनोखा उपयोग केला, तो म्हणजे आपल्या माजी बॉयफ्रेंडसोबत कारच्या मागील सीटवर त्यांनी समागम उरकला. इथपर्यंत ठीक होते.
या घटनेनंतर काही दिवसांनी या बाईला आपल्याला human papillomavirus नावाचा गुप्तरोग झाला असल्याचे समजले. त्यांना हा रोग आपल्या माजी बॉयफ्रेंडसोबत केलेल्या सेक्समुळे झाला हे कळायला वेळ लागला नाही. त्या पुरुषाला कॅन्सर आणि एचपीव्ही नावाचा गुप्तरोग होता ही गोष्ट त्याने त्या बाईपासून लपवून ठेवली. ज्याचा परिणाम म्हणून बाईलाही तो रोग झाला.

