चार्ली चॅप्लिन हे नाव कुणाला माहित नसेल ? याने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, विचार करायला लावलं, आणि त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. इंग्लंडचा सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता, चित्रपट निर्माता आणि संगीतकार म्हणून ओळख असलेला चार्ली चॅप्लिन एकेकाळी जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती होती. त्याच्या मूक चित्रपटांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हसवण्यात आपले जीवन व्यतित केलं. प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीमागे काही अफवा किंवा गमतीदार किस्से असतातच. चार्लीच्या बाबतीत एक विचित्र आणि मजेशीर घटना म्हणजे त्याने स्वतः चार्ली चॅप्लिन सारख्या दिसण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात तो हरला होता. आता हे सत्य आहे की अफवा याचा आपण मागोवा घेऊयात.
असे म्हणतात त्या काळी कॅलिफोर्नियामध्ये एक स्पर्धा भरवली गेली होती. या स्पर्धेत चार्ली चॅप्लिनसारखे हुबेहूब दिसायचे होते. स्पर्धेत खुद्द चार्ली चॅप्लिन सहभागी झाला होता आणि तो हरला असा दावा त्याकाळी प्रसिद्ध असणार्या बहुतांशी वृत्तपत्रांनी केला होता. काही वृत्तपत्रांमधे चॅप्लिनला दुसरे किंवा तिसरे स्थान मिळाले असे नमूद करण्यात आले होते.

