मुंबई-पुण्यापासून माळशेज, नाणेघाट, जुन्नर हा परिसर तसा जवळ आहे. आपण दोन दिवस प्लॅन करून माळशेज घाट, नाणेघाट हा जुन्नर परिसर फिरू शकतो. याचमुळे आपल्याला या परिसरात पर्यटकांची गर्दी दिसते. परंतु या संपूर्ण जुन्नर परिसराला कमीत कमी दोन हजार वर्षांचा इतिहास आहे.
जुन्नर हि सातवाहनांची पहिली राजधानी होती. या विधानाला पुष्टी करणारे काही पुरातत्वीय पुरावे आपल्याला सापडले आहेत. संपूर्ण भारतात एकूण १६०० लेणी आहेत, त्यातील जवळपास १२०० लेणी या महाराष्ट्रात आहेत. या १२०० पैकी ९०० लेणी एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्यातली जवळपास ७०० लेणी जुन्नर परिसरात आपल्याला आढळतात. यावरून आपल्याला जुन्नरचं प्रचंड महत्त्व लक्षात येतं. या पुरातत्वीय पुराव्यांमुळेच अनेक अभ्यासकांनी जुन्नर हि सातवाहनांची पहिली राजधानी होती असं म्हटलं आहे.
ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली की आपल्याला नाणेघाटाचं महत्त्व ध्यानी येतं. त्यामुळे जुन्नर ते नाणेघाट या महत्वाच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या परिसरात अनेक दुर्ग निर्मिले गेले. जुन्नरपासून नाणेघाटपर्यंत आपल्याला दुर्गशृंखला नजरेस पडते. यामध्ये शिवनेरी, हडसर, चावंड, जीवधन, निमगिरी-हनुमंतगड या दुर्गांचा समावेश होतो.






