चेन्नईच्या कलाकाराने हि ऑटो अशी का सजावलीए?

चेन्नईच्या कलाकाराने हि ऑटो अशी का सजावलीए?

कोविडच्या राक्षसाला मारायला केवळ लसीकरण सर्वात प्रभावी उपाय आहे. लसीकरणाचे महत्व तर सगळ्यांना ठाऊक आहेच. तरीही अजूनही काही ठिकाणी लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीय. अनेकांच्या मनात अजूनही भीती आहेच. त्यासाठी सर्व स्तरांतून जनजागृती सुरू आहे. हीच जागृती करण्यासाठी चेन्नईतील एका कलाकाराने एक भन्नाट डोकं लढवून ऑटो रिक्षाचे मॉडेलिंग केले आहे. त्या रिक्षाचा फोटो पाहिलात तर तुम्हीही मनापासून त्याला दाद द्याल.

कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी चेन्नईतील ‘आर्ट किंगडम’ चे संस्थापक गौतम यांनी ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या सहकार्याने ऑटो रिक्षात हा भन्नाट बदल केला आहे. गौतम आणि त्यांच्या टीमने पाईप्स, प्लायवुड, पुठ्ठा वापरुन रिक्षाला सिरिंज आणि लसांच्या कुपीच्या मोठ्या प्रतिकृती चिटकवल्या आहेत. रिक्षाचा रंग ही फिक्या निळ्या रंगाने रंगवलेला आहे.

गौतम हे मागच्या वर्षापासून लसीकरणाविषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. रिक्षाची कल्पना सुचली तेव्हा त्यांनी ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनला संपर्क साधला. आणि त्यावेळी ही ‘लस ऑटो’ बनवण्याचे ठरले. या ऑटोरिक्षाचे काम दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण होणार होते, पण गौतम यांना संसर्ग झाल्याने उशिर झाला. ही लस ऑटो माणिकंदन चालवतात. रिक्षा महानगरपालिकेच्या प्रत्येक भागात जाते, गल्लीबोळात फिरते. त्यामुळे याचा उपयोग लसीकरण वाढवण्यासाठी खूप उपयोग होईल असा त्यांना विश्वास वाटतो.

गौतम आणि इतर स्वयंसेवक फक्त जनजागृती करून थांबत नाहीत, तर लसीकरणाबद्दल काही प्रश्न असतील तर तेही सोडवायला मदत करतात. बऱ्याच जणांच्या मनात भीती आहे तेव्हा त्यांना हे ही समजावून सांगतात की पूर्वी लसींनीच रोगांचे निर्मूलन झाले आहे. अनेकांना लसीसाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती नसते, काहीजणांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यातला फरक माहीत नसतो, त्यांनाही सोप्या शब्दात माहिती सांगितली जाते.

ही लस ऑटो पावसाळ्यात धावणार असल्याने तिची अशी रचना केली गेली आहे की पाऊस पडला तरी तिचे नुकसान होणार नाही.
अशी लस ऑटो चेन्नईच्या रस्त्यांवर धावल्यावर अनेकांचे लक्ष वेधून घेईल हे नक्की. याचा उपयोग लसीकरणाचा वेग वाढवायला होईल अशी आशा करूयात.

शीतल दरंदळे