चेन्नईला शून्य रूपयांची नोट का मिळतेय?

चेन्नईला शून्य रूपयांची नोट का मिळतेय?

चेन्नईच्या रेल्वेस्टेशन, बसस्टेशन आणि मार्केटांत आजकाल एक संस्था शून्य रूपयांच्या नोटा वाटतेय. पण का? कोण आहे ही संस्था? आणि या शून्य रूपयांच्या नोटा लोकांना ते का वाटत आहेत?

प्रश्न बरेच आहेत ना? 

या संस्थेचं नांव आहे पाचवा स्तंभ म्हणजेच फिफ्थ पिलर. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि ही संस्था पाचवा खांब बनून समाजाला आधार देऊ पाहातेय. फिफ्थ पिलर लोकांना भ्रष्टाचाराशी लढायला मदत करतेय. भ्रष्टाचार करणार्‍या म्हणजेच पैसे खाणार्‍याला भारतात कैद आणि नोकरी जाण्याची भीती असली तरी पैसे खाण्यात भारतीय लोक जराही मागे नाहीत. होतं काय, गरीबीमुळं नाडलेला माणूस त्यांना शरण जातो आणि मागितलेले पैसे देऊन टाकतो.

(नोटेची मागची बाजू-स्त्रोत)

अशा भ्रष्टाचारी लोकांना या शून्य रूपयांच्या नोटा देऊन लोक त्यांना एकप्रकारे सांगत आहेत, "आम्ही भ्रष्टाचाराला साथ देणार नाही". लोकांनाही ही कल्पना आवडलीय आणि ते या शून्य रूपयांच्या नोटा वापरत आहेत. खोट्या नोटा मिळाल्याची तक्रार अधिकारी करू शकत नाहीत. कारण तेव्हा त्यांना पैसे खाल्ल्याचं मान्य करावं लागेल. लोक आता घाबरत नाहीयेत आणि त्यांना हेही माहित आहे की या शून्य नोटांच्या आंदोलनास फिफ्थ पिलरला पाठिंबा आहे. या लढ्यात ते एकटेच नाहीयेत, ही कल्पनाही लोकांना खूप आधार देते. 

स्त्रोत

या शून्य रूपयांच्या नोटा लोकांना भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं आवाहन करत आहेत. पैसे न देता आपली कामं करवून घेणं त्यांचा हक्क आहे हे फिफ्थ पिलरचे लोक जनतेला समजाऊन सांगत आहेत. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी या संस्थेनं लग्न, वाढदिवस असे समारंभ जिथे असतात अशा ठिकाणी टेबल मांडून या माहितीचा प्रसार करत आहेत. तिथे ते शून्य रूपयांच्या नोटा, माहितीपत्रकं आणि छोट्या पुस्तिकाही वाटत आहेत. 

आहे ना एकदम भारी कल्पना. लाच मागितलीय? शून्य रूपयांच्या नोटा द्या आणि भ्रष्टाचाराला आळा घाला.