मला लॉटरी लागली तर? असे स्वप्न आयुष्यात प्रत्येकाने बघितले असेल. शाळेत निबंधही लिहिले असतील. यातला विनोदाचा भाग सोडला तर आयुष्यात झटपट पैसा मिळवण्यासाठी अनेकजण लॉटरीच्या तिकटाकडे वळतात. ही नशीब पलटवणारी लॉटरी एकदा तरी लागू दे म्हणून कितीतरी जण रोज तिकीट घेतात. त्यात एखाद्या भाग्यवंताला खरच लॉटरी लागली तर तो आधी काय विचार करेल? स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सर्व पैसे खर्च करेल, आलिशान घर घेईल,गाडी, बंगला, ट्रिप असा प्लॅन करेल. पण मँचेस्टरच्या एका जोडप्याने लॉटरीचे पैसे चक्क मित्र आणि नातेवाईकांना वाटले! त्यांनी ३० चेक आपल्या जवळच्या आप्तेष्टांना कोणताही आव न आणता गुपचूप दिले.
या आगळ्यावेगळ्या जोडीचे नाव आहे, शेरॉन आणि निगेल माथेर. यांनी २०१० मध्ये अंदाजे १०४ कोटी रुपये किंमतीची युरोमिलियन्स लॉटरी जिंकली. त्यांना अनपेक्षित लॉटरी लागल्यावर त्यांनी गाजावाजा न करता शांत राहायचा निर्णय घेतला. त्यांनी मोठे घर घेतले. त्यांच्या जीवनात अनेक मोठे बदल घडणार होते, म्हणून त्यांनी या पैशाचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता सगळ्यांना ते वाटायचे असा निर्णय घेतला. हॉटेल मॅनेजर निगेल आणि कौन्सिल कार्यकर्ता शेरोन यांनी त्यांच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींच्या नावांनी भरलेली यादीच तयार केली. त्या यादीनुसार त्यांनी चेक वितरित केले. त्यात ३०जणांची नावे होती. त्यांच्या नातेवाईकांना चेक देताना त्यांनी त्यात एक संदेश ही दिला. ज्यात लिहिले होते, " कृपया आम्ही जे जिंकलो तिची तुलना म्हणून ही रक्कम पाहू नका. फक्त असा विचार करा की या पैशाने तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल." त्यांच्या मित्र नातेवाइकांना ही अनपेक्षित भेट खूप आवडली.

