श्रीमंत होण्याची स्वप्नं सर्वांनाच पडतात. काहीजण हे स्वप्नं सत्यात उतरवण्यात यशस्वी होतात, पण प्रत्येकाचे स्वप्न दीर्घकाळ टिकेलच असे नाही. यशस्वी होणे आणि ते यश टिकवून ठेवणे ही एक तारेवरची कसरत असते. ही कसरत सर्वांनाच जमेल असे नाही. ३० व्या वर्षी फोर्ब्जच्या श्रीमंत महिलांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या एलिझाबेथ होम्सची ही कथा हेच सांगते.
लहानपणापासूनच श्रीमंत होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या एलिझाबेथ होम्सने कमी वयात आपले हे स्वप्न साकार केले. स्टँनफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतल्यापासूनच आपले हे स्वप्न साकार करण्यासाठी ती धडपडू लागली. १९ व्या वर्षीच तिने आपले एक नवे संशोधन जगासमोर मांडले. या संशोधनाद्वारे तिने असा दावा केला होता की रक्त चाचणी करण्यासाठी सिरींज भरून रक्त काढण्याची काही गरज नाही. अवघ्या काही थेंबांची चाचणी करूनही आपण रक्त तपासणी करू शकतो आणि यासाठी एक नवी मशीन तिने बनवली होती. फक्त काही थेंबांची चाचणी केल्यानंतर रुग्णाच्या रक्ताविषयी सगळी माहिती एकाच दमात मिळणे ही आरोग्य क्षेत्रातील एक मोठी क्रांतीच होती. तिच्या या कल्पनेची भुरळ अनेकांना पडली. ही कल्पना अगदी सामान्य रुग्णापासून ते मोठमोठ्या दवाखान्यापर्यंत सगळ्यांच्याच सोयीची आणि फायद्याची होती.
रक्तातील साखरेपासून ते कॅन्सरच्या निदनापर्यंत अनेक आजारांमध्ये रक्तचाचणी ही एक अनिवार्य बाब आहे. यासाठी लागणारी यंत्रणा आणि वेळ या सगळ्यांचीच बचत होत असेल तर ते सर्वांनाच हवे होते. अशा या आगळ्यावेगळ्या कल्पनेसह आरोग्य क्षेत्रात काम करण्यास उतरलेल्या एलिझाबेथ होम्सने मोठमोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यश मिळवले.



