श्रीगणेश जयंतीसाठी खास -उपासाचे सिझलर

श्रीगणेश जयंतीसाठी खास -उपासाचे सिझलर

धगधगीत गरम तवा, त्याचा चुरचुरणारा आवाज.. सोबत धुपारती केल्यासारखा धुराचा लोट आणि पोटात भुकेचा आगडोंब पसरवणारा बटरचा घमघमाट म्हणजे आलं...  सिझलर टेबलवर आलं!! गरम तव्यासकट टेबलवर सिझलर जेव्हा  येतं तेव्हा आजूबाजूच्या टेबलवरची मंडळी कौतुकानं आदरानं  तुमच्याकडे बघायला लागतात. वेगवेगळ्या भाज्या , चिकन , फ्रेंच फ्राइज यानी सजलेला तवा एखाद्या परदेशी पाककृती सारखा वाटतो. पण नावाने विदेशी असलेलं  म्हणजे सिझलर हा अस्सल देशी  खाद्यप्रकार आहे. (विश्वास बसणं कठीण आहे पण सिझलर अस्सल भारतीय पदार्थ आहे.)
ठाण्यातल्या सिझल देसी या रेस्टॉरंटमध्ये शेफ पराग जोगळेकर यांनी तर आता खास चतुर्थीसाठी  उपासाचे सिझलर्स  आणले आहेत. साबुदाण्याचे वडे -खिचडी-रताळ्याचा किस आणि बटाट्याच्या तळलेल्या काचर्‍यांनी गच्च भरलेलं हे उपासाचं सिझलर जेव्हा तुमच्यासमोर येतं, तेव्हा आज उपास आहे याचा पण विसर पडतो. खास मराठी परंपरेत बसणारं सिझलर फक्त चतुर्थीलाच त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतं. इतर दिवशी सिझलरचे बाकी सर्व प्रकार सिझल देसीमध्ये मिळतात.