दिनविशेष : धिरुभाई अंबानी यांची पुण्यतिथी - शून्यातून अनंत कोटींची झेप घेणारा उद्योजक !!

दिनविशेष : धिरुभाई अंबानी यांची पुण्यतिथी - शून्यातून अनंत कोटींची झेप घेणारा उद्योजक !!

धिरुभाई अंबानी आणि रीलायन्स याबद्दल आम्ही काही वेगळे लिहावे असे काहीच नाही. एडनच्या एका पेट्रोल वितरण करणार्‍या अंबानींनी भारतात परत येऊन रीलायन्सचा पाया घातला. १९७७ नंतरच्या पब्लीक इश्यु नंतर गुंतवणूकदारांना वरचेवर पैसे कमावण्याची संधी दिली. एका अर्थी छोट्या गुंतवणूकदारांना शेअरबाजारात आणण्याचे श्रेय त्यांचाकडे जाते. या नंतर कंपनीच्या यशाची कमान चढतीच राहीली.

तो काळ लायसन्स राजचा होता. अशा काळात कपाल मेहेरा (ओर्के पॉलीस्टर) -नस्ली वाडीया(बाँबे डाइंग) अशा अनेक प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी केवळ अफाट साहसाच्या जोरावर आणि गुंतवणूकदारांच्या जोरावर मागे टाकले. त्यानंतरच्या काळात रामनाथ गोयंका यांनी त्यांच्या इंडीयन एक्सप्रेसच्या माध्यमातून रीलायन्सला कायमचे नाहीसे करण्याचा चंग बांधला. प्रकरण संसदेपर्यंत पोहचले आणि तेथेच संपले कारण रीलायन्सवर केलेला एकही आरोप विरोधकांना सिद्ध करता आला नाही. दुसर्‍या बाजूने कलकत्त्याच्या शेअर दलालांनी रीलायन्सला कचाट्यात पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला पण हा हल्ला धिरुभाईंनी अत्यंत धूर्तपणे खेळी करून परतून लावला, इतकेच नव्हे तर कलकत्त्याचे दलाल कायम स्वरुपी बाजाराच्या बाहेर फेकले गेले.यानंतर रीलायन्सच्या अश्वमेधाच्या घोड्याला अडवण्याचे धैर्य दाखवणारा अजूनही जन्माला यायचा आहे.

स्रोत

त्यांच्या जीवनावर आधारीत "गुरु" हा चित्रपट ज्यांनी पाहीला असेल त्यांना धिरुभाई अंबानी यांच्या व्यक्तिमत्वाची झलक बघायला मिळाली असेल. हार्पर कॉलीन्सच्या 'पॉलीस्टर प्रिन्स" मधून पण त्यांच्या जीवनाचे रेखाटन वाचायला मिळेल पण धिरूभाई अंबानी ही व्यक्ति संपूर्ण समजलेला असा कोणीही अजून तरी जन्माला आलेला नाही.