पोलिसांच्या तपास पध्दतीवर सार्वजनिक माध्यमातून बरळत राहणे ही सध्याची फॅशन आहे. पण वरवर अगदी खाकी दिसणार्या तपासकामात मानवी मनाच्या अनेक मानसशास्त्रीय पैलूंचा वापर केला जातो. 'थेट आरोप करून संशयिताला बोलके करणे' हा त्यातलाच एक प्रकार आहे. निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी रविंद्र भिडे आज आपल्याला सांगणार आहेत अशीच एक कथा!
अशाच एका संध्याकाळी सुमारे चार वाजताचे दरम्यान एका इसमाने मुलुंड पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या गाडीतून त्यांचे रिव्हॉल्वर आणि सोबतच्या बुलेटस दोन्हीही चोरीला गेले होते.
झालं असं होतं की, एका मोठ्या राजकीय पक्षाचे हे नेते दुपारी सुमारे साडेतीन वाजताचे दरम्यान ते पाच रस्ता विभागातील एका दुकानासमोर गाडी थांबवून, दुकानात काही घेण्याकरता अंदाजे पाच मिनिटं गेले होते. छोटेसेच काम असल्यामुळे त्यांनी गाडीची दारे लॉक केलेली नव्हती. दुकानातून खरेदी घेऊन ते परत गाडीत येऊन बसले आणि सहज शेजारच्या सीटवर ठेवलेले पाऊच बघावे म्हणून त्या दिशेने त्यांनी बघितले असता ते पाऊच गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पाऊचमध्ये त्यांचे लायसन्सड्, गोळ्या भरलेल्या अवस्थेतील रिव्हॉल्वर आणि काही सुट्ट्या गोळ्या सुद्धा होत्या. तसंच त्यासोबत त्यांचं आर्म लायसन्स सुद्धा त्यात होतं. त्यांनी दहा-पंधरा मिनिटे आजूबाजूला चौकशी केली परंतु रिव्हॉल्वर असलेले पाऊच न मिळाल्यानं ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आले. रिव्हॉल्वर चोरीला जाणे ही एक गंभीर बाब होती, कारण केवळ रिव्हॉल्वरची चोरी महत्त्वाची नसून ते वापरून आणखी काही गुन्हे होण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती.
आम्ही ताबडतोब त्यांचा एफ. आय. आर. दाखल करून घेतला आणि त्याचवेळेस आमच्या डिटेक्शन स्टाफच्या दोन तुकड्या करून आजूबाजूच्या परिसरात चौकशीकामी पाठवून दिले. त्याच वेळी आम्ही तक्रारदाराला त्याच्या घरी नेऊन चुकून घरात रिव्हॉल्वर राहिले आहे का? याबाबत सुद्धा तपास केला. परंतु त्यांचे रिव्हॉल्वर घरात सापडले नाही आणि त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की ते बाहेर पडताना नेहमी रिव्हॉल्वर असलेले पाऊच बरोबर घेऊनच बाहेर पडत असत आणि त्यादिवशी सुद्धा ते रिव्हॉल्वरचे पाऊच घेऊनच बाहेर पडलेले घरातल्या इतर माणसांनी पाहिले होते.







