या गुरुवारी मुंबईत जुहूमध्ये एक अर्पण नावाचा कॅफे चालू झालाय. तुम्ही म्हणाल, "यात काय विशेष?" पण विशेष आहे. हा कॅफे चालवणारी मंडळी विकासात्मकरित्या अपंग आहेत. त्यांच्यातल्या काही लोकांची विकासात्मक, काहींची बौद्धिक वाढ झाली नाहीय, तर काहीजण स्वमग्न-म्हणजे ऑटिस्टिक-आहेत. त्यांच्या हिंमत आणि चिकाटीनं या १२ विशेष लोकांनी चालू केलेलं मुंबईतलं हे दुसरं रेस्टॉरंट आहे.
मुंबईत यश चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक एनजीओ म्हणजेच स्वयंसेवी संस्था आहे. डाऊन सिंड्रोम आणि स्वमग्नता यांमुळं लोकांची विकासात्मक आणि बौद्धिक वाढ होत नाही. त्यामुळं अपंगत्व आलेल्या लोकांचं जीवनमान आणखी चांगलं करण्याचं काम ही एनजीओ करते. हे अर्पण हे रेस्टॉरंट त्यांनीच चालू केलंय. यापूर्वी या यश चॅरिटेबल ट्रस्टने मुंबईत वेगवेगळ्या डिसॅबिलिटी असणाऱ्या १२ लोकांच्या मार्फत पहिली यशस्वी लंच बॉक्स सेवादेखील सुरु केलीय. इतकंच नाही, तर या एनजीओचा एक सांगितिक गृपसुद्धा आहे. त्याचं नांव तरंग. या ग्रुपमधली मुलं हार्मोनियम, सितार, बँजो आणि तबल्या यासारखी वाद्यं लीलया वाजवतात, भरतनाट्यमसारखं शास्त्रोक्त नृत्य करतात आणि एकदम मस्त तालासुरात गातातदेखील. यांचा सांगितिक कार्यक्रम पाहताना या मुलांची विकासात्मक किंवा बौद्धिक वाढ झालेली नसेल असं वाटतदेखील नाही.

अर्पण कॅफेची संकल्पना कशी सुचली?
यश चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त असलेल्या सुषमा नगरकर सांगतात, " फिलिपिन्सच्या मनिला या शहरात पझल कॅफे नावाचं एक रेस्टॉरंट आहे. ते होजे कॅनॉय (Jose Canoy) नावाच्या स्वमग्न मुलाच्या कुटुंबानं भिन्नक्षम (differently-abled) लोकांसाठी, त्यांना व्यवसाय मिळावा म्हणून चालू केलं होतं. या प्रेरणेतूनच अर्पण कॅफे चालू झाला आहे. अर्थातच, ते आधी सुरु केलेल्या डब्बा डिलिव्हरी सर्व्हिसेसचं विस्तारित स्वरूप आहे. लंच बॉक्स डिलिव्हरीच्या उद्योगाची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळं नेहमीच उत्साहात असणाऱ्या या अर्पण टीमचं कौशल्य आणि आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे." सुषमा नगरकरांची मुलगीही या १२ मुलांच्या टीमचा भाग आहे.
अर्पण कॅफेत काय काय मिळेल?
इथं हेल्दी स्नॅक आयटम्स तर मिळतीलच, पण वेगवेगळ्या प्रकारचे चहा-कॉफी, ज्यूसेस, झालंच तर बर्गर, सँडविच, विविध सॅलड्सही मिळतील. आणि या पलिकडे जाऊन तिथं गायन, वाद्य वादन आणि शास्त्रीय नृत्याचे छोटे छोटे प्रोग्रॅम्स पण असतील. हे सगळे पदार्थ बनवताना खूप शिजवावं वगैरे लागत नाही आणि सोपे पदार्थ असल्यानं ते या मुलांना सहजपणे बनवताही येतात. मंगळवार ते रविवार दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत जुहूला SNDT समोरच्या मेन रोडवर हा कॅफे सुरु असणार आहे. या कॅफेला रुजण्यासाठी आणि वाढण्यासाठीही ग्राहकांची खूप गरज आहे. तेव्हा इथं या, छान छान पदार्थ खा आणि या कॅफेबद्दल तुमच्या मित्रपरिवारालासुद्धा सांगा.
हरिवंशयराय बच्चन म्हणतात, "कोशिश करनेवालोंकी हार नहीं होती". ही मुलं त्यांच्या परीनं जितके प्रयत्न करत आहेत, त्याला तोड नाही. या अर्पण कॅफे, लंच बॉक्स सर्व्हिस चालवणाऱ्या आणि त्याचसोबत आपली संगीताची आवड जोपासणाऱ्या या मुलांचं कौतुक करावं तितकं थोडंच!! नाही का?
