श्वानाने केला वाघाच्या बछड्यांचा सांभाळ! भूतदयेचे हे उदाहरण पाहून दगडालाही पाझर फुटेल!!

श्वानाने केला वाघाच्या  बछड्यांचा सांभाळ! भूतदयेचे हे उदाहरण पाहून दगडालाही पाझर फुटेल!!

'दुनिया मे सबसे बडा योद्धा मा होती है' केजीएफ मधला हा डायलॉग इतकं आईचं समर्पक वर्णन कुठेच सापडणार नाही. आईच्या संघर्षाला जगात तोड नाही. आई ही आई असते मग ती माणसाची असो की प्राण्याची!! तरीही काही आया अशा असतात ज्या परिस्थितीमुळे कधीकधी आपल्याच लेकराचा अव्हेर करतात. अर्थात अशाही आया फक्त माणसात असतात असे नाही तर प्राण्यातही असतात. म्हणूनच आज एक श्वान वाघिणीच्या पिल्लांची आई बनण्याची भूमिका वठवत आहे. 
ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याने अनेकांना आश्चर्य वाटले. हा व्हिडिओ पीस ऑफ नेचर या पेजवरून शेयर करण्यात आला आहे. यात एका कुत्रीच्या आजूबाजूला वाघिणीचे तीन बछडे  फिरत असल्याचे दिसले त्यांच्याकडे बघून ते जणू आपल्या आईभोवती फिरत आहेत असेच वाटेल. ही कुत्री पण त्यांना अतिशय आपुलकीने गोंजारताना दिसेल.

एक लॅब्राडोर जमातीची कुत्री वाघिणीचे तीन बछडे पालनपोषण करून वाढवत असल्याचे समजले. ही गोष्ट तशी चीनमधील आहे. एका वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला आणि जन्म दिल्यावर त्यांना सोडून दिले. एवढेच काय, त्यांना साधे दूध सुद्धा पाजले नाही. अशावेळी ही कुत्री आई बनून धावून गेली आणि तीच आता त्यांची आई झाली आहे.


परंतु वाघिणीने आपल्या पिलांना का बरे टाकून दिले असेल? यामागे अनेक कारणे सांगितली जातात. बछडे कमकुवत, आजारी असतील तर त्यांना टाकून दिल्याच्या घटना दिसतात. काही वाघिणी स्वतः आजारी किंवा जखमी असल्यावर शावकांना खाऊ पिऊ घालू शकत नाहीत म्हणून सोडून देतात.


गेल्या वर्षी असेच एका काळ्या चित्त्याला सोडून देण्यात आले होते. त्याचीही गोष्ट व्हायरल झाली होती. या चित्त्याच्या आईने जन्माच्या एका आठवड्यात या चित्त्याला सोडून दिले होते. व्हिक्टोरिया नावाच्या एका जंगली मांजरांचा सांभाळ करणाऱ्या बाईने त्या चित्त्याला घरी नेले होते.
या व्हिडीओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. प्राण्यातही भावना असतात आणि त्यांच्यातही दयाबुद्धी असू शकते याचेच हे द्योतक नाही का?