गौरी गणपती हा आपला मोठा सण. पण गंमत म्हणजे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक घरी तो वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो.
आज आपण बोलूयात गौरींबद्दल. कुठं त्यांना गौरी म्हणतात तर कुठं महालक्ष्म्या! त्यात पण काही ठिकाणी या नुसत्या गंगा-गौरी येत नाहीत, तर त्यांची मुलंबाळंपण सोबतीला असतात. नावातला फरक सोडला तर कुठं खड्यांच्या गौरी असतात, कुठं तांब्यांतल्या, कुठं बसलेल्या तर कुठं उभ्या. तीच प्रथा हळदीकुंकवाची. काही ठिकाणी गौरींच्या दुसऱ्या दिवशी हळदीकुंकू असतं तर काही ठिकाणी ते असतं गौरीविसर्जनादिवशी.. इतकंच काय, काही घरी एकच गौर असते तर काही घरी दोघीही भोळ्या शंकरोबासोबत भांडून येतात माहेरपणाला आपल्या घरी!!
काही असो, घरात गौरी असतात इनमीन तीनच दिवस पण तेवढे दिवस घराला आगळंच रूप येतं. शांत-प्रसन्न देखणी गौराई दृष्ट लागावी अशी सुंदर दिसत असते. जे काही आसपास ताज्या पाण्याचं ठिकाण असतं, तिथून या गौरी पुजून पत्रीसोबत घरात आणली जाते. घरातली चिमुकली त्या रांगोळ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मोत्यांच्या, सोन्याच्या, अन्नधान्याच्या, भराभराटीच्या पावलांनी गौरीला घरात आणते आणि मग सोहळा चालू होतो गौरींना सजवण्याचा. गौरींना साड्या नेसवणं, दागिने घालून तयार करणं हे तर खास काम. सगळ्यांचं आवडतं.
आधी सुरू होतं गौरींना उभं करणं. पूर्वी डब्यांवर डबे आणि सगळ्यात वरती एक तांब्या ठेवून गौरीचा मुखवटा ठेवला जाई. अजूनही काही ठिकाणी धान्याच्या कोठयांमध्ये गौर उभी केली जाते, काही ठिकाणी कळशीवर कळशी तर काहीजणांनी यासाठी खास सांगाडेच ततयार करून घेतले असतील. सांगाडे असतील तर काही अडचण नाही, पण इतर काही प्रकारांनी गौर उभारायची असेल तर मानेभोेवती उलटा हँगर बांधून- म्हणजे अडकवायची बाजू मागे ठेवून- खांदे तयार केले जातात. नाहीतर पडलेल्या खांद्याच्या गौरीही असतातच. सगळ्यात कौशल्याचं काम म्हणजे साड्या नेसावण्याचं.
प्रत्येक घरी साडी नेसवायची पद्धत वेगळी असेलच. पण यावर्षी काही वेगळं करून पाहायला काय हरकत आहे? तर मंडळी, व्हिडीओ पाहा. आवाज बंद करून पाहिला तरी हरकत नाही कारण व्हिडीओ आहे कन्नड भाषेत. आपल्याला पद्धत कळाल्याशी मतलब, होय ना? तर या पद्धतीत या बाईंनी दोन साड्या वापरल्या आहेत, एक आहे नेसूची आणि दुसरी वापरलीय ब्लाउज आणि हात म्हणून. म्हणजे घरी तुमच्याकडे हातवाल्या गौरी नसतील तर हा प्रकार खूपच उपयोगी आहे. नेसूच्या साडीच्या खूप निऱ्या करून तिला इथं त्यांनी अर्ध्यात दुमडलं आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या साडीच्या कशा खूप निऱ्या असतात, तसं काहीसं इथं केलंय. गंमत म्हणजे या काकू खूप हुशार आहेत. उभी गौर, पद्मासनातली गौर असे वेगवेगळे पर्यायपण त्यांनी दिले आहेत.
यांची गौर कर्नाटकी आहे आणि आपली महाराष्ट्रातली पद्धत वेगळी असते. पण म्हणून काय झालं, हौसेला थोडंच मोल असतं!! आपल्या घरच्या पद्धती पूर्ण बदलाव्यात असं आमचं बिल्कुल म्हणणं नाही, पण दुसऱ्यांच्या चांगल्या आयडिया वापरायला काय हरकत आहे? तुमच्याकडेही अशा काही भन्नाट आयडिया असतील तर नक्की शेअर करा. हवंतर फोटो आणि व्हिडीओ पण टाका..

