रांगेत उभे राहण्याचे काँट्रॅक्ट घेणारा हा माणूस रोज काय कमावतो ते बघा !

लिस्टिकल
रांगेत उभे राहण्याचे काँट्रॅक्ट घेणारा हा माणूस  रोज काय कमावतो ते बघा !

लायनीत उभे राहणे यासारखे कंटाळवाणे दुसरे काम नाही.याच कारणाने अनेकजण स्वतः उभे न राहता दुसऱ्या कुणाला उभे करता  येते का ते बघतात. काही लोक असतात ते बिचारे दुसऱ्याच्या जागी उभे राहतात.एक भाऊ मात्र लैच डोक्यालिटीवाला निघाला. त्याने या कामाचा थेट धंदाच उभा केला.

काहींना हे खरे वाटणार नाही, फ्रेडी बेकीट नावाचा एक गडी आहे. त्याने सोपी युक्ती शोधली श्रीमंत लोकांना लायनीत उभे राहण्यासाठी स्वतःच्या ऐवजी दुसरे कुणी लागते हे ओळखून तो स्वतः त्यांच्यासाठी लायनीत उभा राहायला लागला. या कामातून तो थोडेथोडके नव्हे तर दिवसाला तब्बल १६ हजार रुपये कमवून घेतो.

आपल्याकडे महिन्याला ५ लाख कमवणारे श्रीमंत समजले जातात. ती श्रीमंती या भावाला फक्त लायनीत उभे राहून मिळाली आहे. ३१ वर्ष वय असलेला हा फ्रेडी ऐतिहासिक कादंबऱ्या लिहितो. दिवसभर लायनीत उभे राहून पैसे कमवायचे आणि आरामात कादंबऱ्या लिहायचे असे गेली तीन वर्षे तो करत आहे.

तो सांगतो की, ६० वर्षांच्यावरील श्रीमंत लोकांना लायनीत उभे राहण्याऐवजी एखाद्याला पैसे देऊन लायनीत उभे करणे तसे विशेष नसते. त्यातही काही लोकांसाठी पैसे नाही तर वेळ महत्वाचा असतो. असे सगळे लोक त्याचे ग्राहक आहेत. काही कार्यक्रमांमध्ये लवकर पोहोचून तिकीट मिळवणे महत्वाचे असते अशा ठिकाणी या पठ्ठ्याची गरज पडते. 

त्याचे काम दिवसभरात ८ तास असते. यातील लायनीत उभे राहण्याचे ३ तास आणि बाकी वेळ आपल्या ग्राहकांसाठी काढलेले तिकीट गोळा करणे आणि ते त्यांना सुपूर्द करणे यात जात असल्याचे तो सांगतो. हे काम तसे इतकेही सोपे नाही. कधीकधी भर थंडीत लायनीत उभे राहावे लागते.

तसा त्याचा बिजनेस इतकाच नाही. तो गार्डन सांभाळणे, घरातले पाळीव प्राणी सांभाळणे, पॅकिंग करणे असे कामेही करतो. या सर्व कामांची रीतसर जाहिरात देऊन तो ही कामे मिळवतो. आपल्याकडे मोटिव्हेशनल स्पीकर नेहमी सांगतात आजूबाजूला बघा ज्या गोष्टीची कमी आहे ते काम सुरू करा. फ्रेडीने ही गोष्ट चांगलीच सिरीयसली घेऊन बक्कळ पैसा कमावला हे नक्की म्हणता येऊ शकते.

उदय पाटील