दिवस रात्र, चोवीस तास, बारा महिने, वर्षाचे ३६५ दिवस देशाचं संरक्षण करणाऱ्या भारतीय जवानांबद्दल आपल्या मनात आदर नक्कीच असला पाहिजे. त्यांच्या अभेद्य संरक्षणामुळेच आपण सुरक्षित आहोत. मंडळी, हा आदर वाढवणारी एक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. ऐन थंडीच्या दिवसात ही पोस्ट आली होती. एकीकडे आपण थंडीत कुडकुडत असताना भारतीय सैन्य मात्र बर्फाळ प्रदेशात खडा पहारा देत आहेत.
मंडळी, या पोस्टमध्ये २ भारतीय सैनिक सियाचीन सारख्या बर्फाळ प्रदेशात शून्यापेक्षाही कमी अशा -५० डिग्री सेल्सियस तापमानात झोपलेले दिसत आहेत. अशा भयंकर थंड तापमानात सामान्य माणूस राहूच शकणार नाही. पण हे भारतीय सैनिक आहेत राव. त्यांची जिद्द इथेच दिसून येते.

मंडळी, हा फोटो जरी अभिमानास्पद असला तरी दुर्दैवाने खोटा आहे. असं नाही की भारतीय सैन्य अशा तापमानात राहत नाही. पण हा जो फोटो आपल्याला दाखवण्यात येत आहे तो मात्र खोटा आहे. किरन खेर पासून श्रद्धा कपूरच्या फेसबुक पेज पर्यंत अनेक प्रसिद्ध सोशल मिडिया ग्रुप आणि पेजेसवर हा फोटो व्हायरल झाला होता.
...मग फोटो आहे तरी कोणाचा ?
मंडळी, एक मात्र खरं आहे की फोटोमध्ये दिसणारे हे दोघेही खरे सैनिक आहेत. पण ते भारतीय नसून रशियन आर्मीचे जवान आहेत. २०१३ मध्ये रशियन सैन्याच्या सैन्याभ्यासाच्या वेळी हा फोटो काढला होता. फोटोवरून देशाचा पत्ता लागत नसल्याने अनेकांचा यामुळे गोंधळ उडाला.
मंडळी, फक्त आपल्याच देशात नाही तर इतरही ठिकाणी अशाच गोष्टी व्हायरल होत असतात. आता हाच फोटो युक्रेनच्या सैनिकांचा आहे म्हणून युक्रेनमध्ये व्हायरल झाला आणि तिथे सुद्धा लोकांनी देशाभिमानी होऊन त्याला आणखी व्हायरल केलं. म्हणजेच युक्रेन असो वा भारत; घरोघरी मातीच्या चुली.
फॉरवर्ड झालेली गोष्ट खरी आहे हे समजून त्याला अजून पसरवणे किती चुकीचे आहे हे यावरूनच दिसते. मंडळी, देशाभिमान हा असलाच पाहिजे पण तो चुकीच्या गोष्टींमुळे नसावा एवढंच वाटतं. मंडळी हा फोटो तर खोटा होता पण आज आम्ही दाखवणार आहोत सियाचीनमधल्या भारतीय जवानांचे काही अस्सल फोटो ज्यामुळे तुमची मान खऱ्या अर्थाने उंचावेल!!




