२०१७ चे १० फ्लॉप सिनेमे....यातील किती तुम्ही बघितलेत ??

लिस्टिकल
२०१७ चे १० फ्लॉप सिनेमे....यातील किती तुम्ही बघितलेत ??

सिनेमा प्रेमी २०१७ डोळ्याची निरांजनं करून या वर्षाची वाट बघत होते ते फक्त एकाच करणासाठी.  ते कारण म्हणजे ‘बाहुबली २’. तो आला, तो रिलीज झाला आणि त्याने जिंकलं. मंडळी २०१७ ने आपल्याला ‘बाहुबली २’, ‘जॉली एल. एल. बी २’, ‘न्यूटन’,  आणि नुकताच आलेला ‘टायगर जिंदा है’ सारखे हिट सिनेमे तर दिलेच,  पण त्याच बरोबर काही फ्लॉप आणि टुकार सिनेमे सुद्धा दिले.

आज आपण बघणार आहोत २०१७ मध्ये फ्लॉप झालेले १० सिनेमे. (बघणार म्हणजे फक्त लिस्ट बघणार आहोत राव...घाबरू नका !!)

१. सरकार ३

१. सरकार ३

राम गोपाल वर्मा यांच्या फ्लॉप सिनेमांच्या यादीत आणखी एक भर पडली ती ‘सरकार ३’ मुळे. सत्या, कंपनी, सारखे सिनेमे बनवणारा हाच का तो राम गोपाल वर्मा? असा प्रश्न पडावा असं सरकार ३ बघून वाटतं.

२. राबता

२. राबता

क्रिती सॅनन आणि सुशांत सिंह राजपूत या जोडीने पहिल्यांदा एकत्र काम केलं. राजकुमार राव सारखा अभिनेतासुद्धा एका लहानशा भूमिकेत दिसून येतो. पण कथा चांगली हवी ना राव, कास्टिंग कोणाचीही असो.

३. जग्गा जासूस

३. जग्गा जासूस

रणबीर कपूर आणि कतरिना यांचा जग्गा जासूस येणार म्हणून अनेक दिवस लोकांनी वाट बघितली आणि अखेर तो २०१७ मध्ये आलाच. पण अनुराग बासू याच्या बर्फीची जादू इथे दिसली नाही. कमजोर कथा आणि पटकथा. लोक तर सिनेमा चालू असतानाच उठून निघून गेले राव.

४. नूर

४. नूर

सोनाक्षी सध्या फार सिनेमांमध्ये दिसत नाही. तिचे यावर्षी २ सिनेमे आले. त्यातील पहिला ‘नूर’. एका पाकिस्तानी पुस्तकावर आधारलेला हा सिनेमा होता.  पण पटकथेत कमी पडल्याने त्याला कमाल दाखवता आली नाही.

५. मशीन

५. मशीन

अब्बास-मस्तान सारखे हिट दिग्दर्शक. या जोडीतल्या अब्बास यांचा मुलगा मुस्तफा याच्या लाँन्चींगसाठी खास तयार करण्यात आलेला सिनेमा म्हणजे मशीन. लाँन्चींगचा सिनेमा २०१७ चा सर्वात टुकार सिनेमा होईल असा विचार देखील कोणी केला नसणार राव. हा सिनेमा पहिला असा सिनेमा आहे ज्याला बघायला फक्त १ प्रेक्षक गेला होता. या सिनेमाने अशा पद्धतीने एक वेगळा इतिहास निर्माण केलाय.

६. हॅरी मेट सेजल

६. हॅरी मेट सेजल

शाहरुख आणि अनुष्का शर्मा यांचा हा सिनेमा. शाहरुखच्या सिनेमांकडून आता फारशा काही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. तसंच याचं सुद्धा झालं. हा सिनेमा आला, आपटला आणि निघून गेला. फक्त वाईट वाटलं ते ‘इम्तियाज अली’ या चांगल्या दिग्दर्शकाचं.

७. ट्यूबलाईट

७. ट्यूबलाईट

भाईचे २ सिनेमे या वर्षी रिलीज झाले. त्यातला ट्यूबलाईट हा अत्यंत वाईट पडला. पण त्याची कमी भरून काढली ‘टायगर जिंदा है’ ने. अर्थात तो पण काही ग्रेट सिनेमा आहे अशातला भाग नाही.

८. रंगून

८. रंगून

विशाल भारद्वाजसारख्या मोठ्या दिग्दर्शकाचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. कंगना, शहीद आणि सैफ अली खान अशी तगडी स्टार कस्ट असूनही सिनेमा काही ‘रंगून’ आला नाही.

९. सिमरन

९. सिमरन

अलिगढ, शहीद सारखे उत्तम सिनेमे देणारे दिग्दर्शक हंसल मेहता’ यांचा हा चित्रपट. कंगनाने ‘क्वीन’ मध्ये जी जादू दाखवली होती तीच इथे बघायला मिळणार असं वाटत होतं.  पण मुळात लिखाणातच चित्रपट कमी पडल्याने कंगना सुद्धा काही करू शकली नाही. शेवटी चित्रपट फ्लॉप झाला.

१०. ओके जानू

१०. ओके जानू

अजूनही अभिनयाच्या बाबतीत बाल्यावस्थेत असलेली जोडी या सिनेमात होती. कोण म्हणून काय विचारता? आपल्या शक्तीची लेक ‘श्रद्धा’ आणि आदित्य रॉय कपूर. ‘मणीरत्नम’चा तमिळ सिनेमा हिंदीत तयार झाला पण त्याच्या कथेची अशी वाट लागली की त्याचा ‘ओके जानू’ झाला. कमाल दाखवली ती 'ए आर रेहमान'च्या 'हम्मा हम्मा' गाण्याने. 

तर मंडळी, यातील किती सिनेमे तुम्ही बघितलेत ?