२०१६ मध्ये एका मुलीने घरात बाथरूमची व्यवस्था नसल्यानं लग्न करायला नकार दिला होता. यावर्षी मार्चमध्ये एका मुलीने जोपर्यंत बाथरूम बांधणार नाही तोवर मी लग्न करणार नाही असं ठणकावलं होतं. या बदलाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक घटना घडली आहे मंडळी...
उत्तर प्रदेशच्या मुरारपट्टी इथं राहणाऱ्या एका मुलीनं होणारा नवरा गुटखा, तंबाखू खातो म्हणून लग्नाला साफ नकार दिलाय. झालं असं की लग्नासाठी जेव्हा मुलगी मंडपात आली, तेव्हा तिनं मुलाला तंबाखू खाताना बघितलं आणि तिथेच या व्यसनी माणसाशी लग्न करणार नाही असा निर्णय घेतला.
अर्थात तिच्या निर्णयाने सगळ्यांना धक्का बसला. सर्वांनी तिला समजावलं, पण काही उपयोग झाला नाही राव. शेवटी मुलाच्या घरच्यांनी तिच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली. पण तरीही ती मागे हटली नाही. मानलं राव या मुलीला!!
’टॉयलेट : एक प्रेम कथा" अश्याच एका साहसी मुलीच्या निर्णयावर आधारित सिनेमा ११ ऑगस्ट २०१७ ला रिलीज होतोय. सिनेमात लग्नानंतर घरी बाथरूम नसल्याने मुलगी घर सोडून निघून जाते असं त्यात दाखवण्यात आलंय.
बघा, गाय छाप मळणारं कुणी असेल तर आत्ताच निर्णय घ्या..

