आपण कधी कुठे कुणाच्या पोटी आणि कसा जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते. अपघाताने म्हणा किंवा आणखी कशाने, आपण जन्माला येतो आणि मरेपर्यंत जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यात किंवा जगण्याचा अर्थ शोधण्यातच आयुष्य खर्ची घालतो. कोणी हातापायाने धडधाकट जन्मते, तर कोणाच्यात जन्मत:च काही व्यंग असते. जे धडधाकट जन्माला आलेत त्यांची काही आयुष्याबाबत तक्रार करण्याची गरज नसते. तरीही हे लोक कुरबुरी करत जगत असतात. पण ज्यांना निसर्गानेच अन्याय करून पाठवले आहे, त्यांचं काय? शारीरिक कमतरतेसह जन्माला येणे आणि त्यासोबत जगणे म्हणजे त्यांना शिक्षा वाटली तर चुकीचे काय? पण अनेकदा असे लोकच धडधाकट लोकांपेक्षा अधिक आनंदाने आयुष्य जगत असल्याचे दिसते. असे असले तरी त्यांना आपल्या जन्माला कारणीभूत ठरलेल्या काही व्यक्तींना दोष द्यावा वाटत असेल तर?
आपल्या दुर्द्शेसाठी आपल्या आईवर उपचार करणारी डॉक्टरच जबाबदार असल्याचा भावनेतून इंग्लंडच्या एका वीस वर्षीय तरुणीने ती गर्भावस्थेत असताना तिच्या आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर तिला जन्माला घालण्याचा सल्ला दिल्याबद्दल केस केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊया.
एवी टूम्ब्ज नावाच्या या मुलीचा जन्म २००१ मध्ये झाला. जन्मत:च तिला स्पाइना बिफिडा नावाच्या एका दुर्धर आजाराने ग्रासले. एवी टूम्ब्जच्या मते ती आईच्या पोटात असतानाच तिला हा आजार झाल्याची माहिती डॉक्टरांना होती आणि ते अशा आजारासह जन्मणाऱ्या तिचा जन्मच रोखू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. गर्भवती मातेला फॉलिक ॲसिडची कमतरता भासली की तिच्या मुलाला हा आजार होऊ शकतो, इतकेही या डॉक्टरांना माहिती नसावे का? किमान त्यांनी आईला फॉलिक ॲसिडची योग्य प्रमाणात औषधे दिली असती तरी माझी ही अवस्था झाली नसती असे एवीचे म्हणणे आहे. मीही इतर सामान्य लोकांप्रमाणेच जगू शकले असते. केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्यावर ही वेळ आली असे एवीचे म्हणणे आहे. म्हणूनच तिने लिंकनशायरमधील डॉ. मिशेल हिच्यावर लाखो पौंडांची नुकसान भरपाई मागणारी केस दाखल केली आहे.


