थोडी खुशी, थोडा गम : GST मुळं काय होणार स्वस्त आणि काय होईल महाग?

थोडी खुशी, थोडा गम : GST मुळं काय होणार स्वस्त आणि काय होईल महाग?

येत्या १ जुलै पासून देशभरातील बहुचर्चित असा वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST लागू होईल. ज्यामुळं एखाद्या वस्तू किंवा सेवेवर लादले जाणारे खरेदी कर, जकात कर, प्रवेश कर, मूल्यवर्धित कर, करमणूक कर, विक्री कर, उत्पादन शुल्क असे भरमसाठ कर नाहिसे होऊन त्याजागी एकच कर आकारला जाईल. GST मुळं देशाच्या करव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडून येतील असं बोललं जातंय. नुकत्याच श्रीनगरमध्ये झालेल्या GST कौन्सिल मीटिंगमध्ये GST आकारणीच्या अंतिम स्वरूपावर शिक्कामोर्तब झालंय. आज आपण थोडक्यात या सगळ्याबद्दल माहिती घेऊया.

 

GST मध्ये सर्व वस्तूंवर सारखाच कर न आकारता वस्तू आणि सेवांच्या स्वरूपानुसारून त्यांना ४ श्रेणींमध्ये विभागलं गेलंय. ५%, १२%, १८%, आणि २८% अशा या श्रेणी आहेत. म्हणजेच ५% श्रेणीतल्या वस्तूंवर ५% GST आकारला जाऊन त्या स्वस्त होतील, तर २८% श्रेणीत मोडणाऱ्या वस्तू या महाग होतील. पण दुध, अन्नधान्य, वृत्तपत्रं, मध, भाजीपाला, सुती कपडे, या वस्तूंवर GST आकारला जाणार नाहीये. त्यामुळे या वस्तू स्वस्तच राहतील.

 

5% ते १८% श्रेणींमध्ये मोडणाऱ्या वस्तू किंवा सेवा या आपल्यासाठी स्वस्त ठरतील. ज्यात टूथपेस्ट, मिठाई, दुचाकी, खाद्यतेल, साबण, पुस्तकं, धान्यं, अशा दैनंदिन उपयोगी गोष्टींचा समावेश होतो. त्याचबरोबर चांगली गोष्ट म्हणजे हॉटेल्स, विमानप्रवास, रेल्वे प्रवास, सिनेमा आणि चक्क लग्झरी गाड्याही बर्‍यापैकी स्वस्त होणार आहेत. कारण या गाड्यांवर याआधी ५०% कर आकारण्यात यायचा. आता तो २८+१५ असा ४३% आकारण्यात येईल.

महाग होणाऱ्या वस्तूंच्या यादीमध्ये फ्रीज, टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, लहान आणि मध्यम आकाराच्या गाड्या, मोबाईल्स, कॉम्प्युटर, शीतपेयं, सिगारेट, इंटरनेट,ऑनलाईन शॉपींग, बँकींग, विमा या सगळ्या गोष्टींचा समावेश होतोय. कारण या चैनीच्या वस्तू आणि सेवा २८% च्या श्रेणीत गेलेल्या आहेत.

तूर्तास पेट्रोल, डिझेल, सोने - चांदी, दारू, पादत्राणं, डबाबंद खाद्यपदार्थ, या सगळ्यांना GST पासून मुक्त ठेवलं गेलंय. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधी मंडळातही GST अधिनियम सर्वमताने मंजूर झालाय.

बघायला गेलं तर एकीकडे GST मुळे सामान्य वर्गाला उपयोगासाठी गरजेच्या वाटणार्‍या वस्तू महाग होतील. तर दुसरीकडे मानवी जीवनावश्यक वस्तू स्वस्तही होतील. त्यामुळे ही नवीन करप्रणाली कोणत्या वर्गासाठी कीती चांगली ते येणारा काळच सांगेल.