२० एप्रिल, रविवारी श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडला. यात तब्बल २५३ लोकांचा बळी गेला होता. या घटनेला एक आठवडा होतोय तोच काल बातमी आली की भारतातल्या ८ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होणार आहे. ही बातमी मिळताच आज सगळीकडे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, पण ही बातमी खोटी आहे. याचा शोध कसा लागला हे आपण आज जाणून घेणार आहोत.
8 राज्यात दहशतवादी हल्ला होणार ?? बंगळूरू पोलिसांच्या व्हायरल पत्रामागील सत्य जाणून घ्या !!


काय आहे प्रकरण ?
हे सर्व सुरु झालं ते एका फोन कॉलने. स्वामी सुंदरी मूर्ती या कर्नाटकच्या व्यक्तीने बंगलोर पोलिसांना फोन करून तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, पुडुचेरी , गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होणार आहे अशी बातमी दिली होती. एवढंच नाही तर तामिळनाडूच्या रामनाथपुरम येथे १९ दहशतवादी फिरत असल्याचं पण त्याने सांगितलं होतं.

हा माणूस कोण याचा शोध घेत पोलीस बंगलोरच्या अवळहळ्ळी येथे पोहोचले. काल रात्री १० च्या सुमारास त्याला पकडण्यात आलं. असं म्हणतात की स्वामी हा निवृत्त जवान आहे. पण हे खरं आहे की नाही याबाबत शंका आहे. तूर्तास मिळालेल्या माहितीवरून तो एक बंगलोर मध्ये ट्रक चालवतो. त्याने फोन करून खोटी माहिती दिली होती.
मंडळी, हे खोटं आहे हे माहित असूनही कोणताही धोका टाळण्यासाठी बंगलोर पोलिसांनी पत्र पाठवून सर्व राज्यांना खबरदारीची सूचना दिली होती.

मंडळी, सुदैवाने ही बातमी खोटी होती, पण पुन्हा एकदा लक्षात घ्यायला हवं की अफवा पसरवणे गुन्हा आहे. त्याच बरोबर सावधता बाळगणे हे आपलं कर्तव्य देखील आहे.
बोभाटाच्या वाचकांसाठी एक प्रश्न :
अशा प्रकारचं महत्वाचं पत्र मिडीयाकडून प्रसिद्ध करणं बरोबर आहे की चूक ?