फोनचे सिम घेण्यासाठी आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून खूपजण देतात. आपल्या आधार कार्डवर आपण २-३ सिम घेतो. कधी नवा फोन घेतला की परत सिम घेतले जातात. घरातल्या ज्येष्ठांसाठी किंवा मुलांसाठी जास्तीचे सिम घेऊन ठेवले जातात. काही वर्षांनी असे होते की आपण आधारकार्डची ओळख दाखवून किती सिम घेतले आहेत हे लक्षात ही राहत नाही. यामुळे एकाच्या नावावर बरेच नंबर राहतात.
बऱ्याचदा एखाद्या सेल्युलर कंपनीची आवडली नाही किंवा त्यापेक्षा चांगली ऑफर दुसऱ्या कंपनीने दिली तर आपण नवे सिम घेतो आणि जूने ठेवून देतो. नंबर पोर्ट करण्याची सुविधा असली तरी कटकट कशाला करून घ्या म्हणून नवीन सिम घेतलं जातं. काही दिवसानंतर आपण ते विसरून जातो. पण कधी हे सिम जर चुकीच्या माणसाच्या हाती पडले तर तुमच्या नावावर एखादा फ्रॉडही घडू शकतो. त्यामुळे आधार कार्ड वर घेतलेले सिम तुम्ही जर वापरत नसाल तर ते लगेच डीॲक्टिवेट करा. आधार कार्डवर किती सिम जोडली गेली आहेत याची माहिती कशी होणार? हा प्रश्न पडला असेल तर त्यासाठी तुम्ही दूरसंचार विभागाच्या वेबसाइटची मदत घेऊ शकता.
या वेबसाइटद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून किती सिम घेतले आहेत किंवा सध्या वापरात आहेत हे शोधू शकता. तुम्ही वेबसाइटद्वारे निरुपयोगी सिम बंद करण्याची विनंती देखील करू शकता. या सेवेला टेलिकॉम ॲनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असे नाव देण्यात आले आहे. ही सेवा अजून संपूर्ण देशात उपलब्ध नसली तरी लवकरच ती सगळीकडे सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही सेवा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

