या जगात अपत्य प्राप्ती सारखा दुसरा आनंद नाही. परंतु अनेक दांपत्यांना हा आनंदही सहजासहजी मिळत नाही. वैद्यकीय क्षेत्रात यावर आयव्हीएफ आणि सरोगेसीसारखे उपाय निघाले असले तरी हा पर्यायही वाटतो तितका साधा सोपा अजिबात नाही. भारत, नेपाळ आणि थायलंड यांसारख्या देशांनी तर सरोगसीवर कायदेशीररित्या बंदीच आणली आहे. असे असले तरी अनेक देशात सरोगेसीने मोठ्या बाजारपेठेचे स्वरूप घेतले आहे. या यादीत युक्रेनचे नाव अगदी वरचे आहे. सरोगेसीच्या माध्यमातून अपत्य हवे असणाऱ्या दांपत्यासाठी युक्रेन हे ऑनलाईन बेबी स्टोअर बनले आहे. म्हणूनच युक्रेनला आजकाल ‘बेबी फॅक्टरी’ म्हणून ओळखले जात आहे. यामागची नेमकी कारणे काय आहेत जाणून घेऊया या लेखातून.
युक्रेनमधील बसेसमध्ये, रेल्वेमध्ये, प्लॅटफॉर्मवर सरोगसीसाठी पात्र स्त्रिया हव्या असल्याच्या जाहिराती तुम्हाला सर्रास पाहायला मिळतील.
तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहात? तुमचे वय १८ ते ३५ दरम्यान आहे? तुम्हाला सदृढ मुले आहेत? मग आम्हांला तुमच्या सारख्याच महिलांची गरज आहे. अशा आशयाच्या जाहिराती अक्षरश: जागोजागी पाहायला मिळतील. युक्रेनमध्ये सरोगसीसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी एका सरोगेसी मागे महिलेला ११,०००$ इतकी रक्कम मोजते. शिवाय गर्भावस्थेच्या काळात त्यांना महिन्याचे २५०$ स्टायपेंड मिळतो. सरळ साधी नोकरी करणाऱ्या सामान्य माणसाच्या पगाराशी तुलना केल्यास ही रक्कम जवळपास तिपटीने जास्त भरते.
सरोगेसीमुळे एखाद्या दांपत्याला अपत्य प्राप्तीचा आनंद मिळू शकतो ही जरी याची एक लखलखती बाजू असली तरी, याची दुसरी बाजू कितीतरी अंधकारमय आहे. सरोगेसी करून देण्याचे काम करणाऱ्या कंपन्या ज्या ते दांपत्य आणि सेरोगेसी मदर यांच्यामधील दुव्याचे काम करतात, अनेकदा दोन्ही बाजूची फसवणूक करत असल्याचे दिसतात.
सेरोगेसीसाठी त्या महिलेला जितकी रक्कम देण्याचे कबूल केले होते त्यापेक्षा कमीच रक्कम प्रत्यक्षात त्यांना मिळते. याउलट सेरोगेसी करवून घेणाऱ्या दांपत्याकडून मात्र भारीभक्कम रक्कम वसूल केली जाते.



