हा हैद्राबादचा पोलीस जिंकतोय सगळ्यांची मनं...वाचा त्याने नक्की काय केलं ते !!

हा हैद्राबादचा पोलीस जिंकतोय सगळ्यांची मनं...वाचा त्याने नक्की काय केलं ते !!

माणुसकी अजूनही शिल्लक आहे हे सिद्ध करणारं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हैद्राबादची ही घटना. हैद्राबाद मध्ये ट्रॅफिक पोलीस असलेला बी गोपाल याचा एक फोटो सध्या नेटकऱ्यांची मनं जिंकतोय. या फोटो मध्ये तो एका ८० वर्षाच्या बेघर स्त्रीला अन्न अन्न भरवताना दिसत आहे.

चला नक्की काय घडलंय ते एकदा जाणून घेऊ.

स्रोत

कुकुटपल्ली, हैद्राबाद जवळ वाहतूक नियंत्रण विभागात काम करणारा बी गोपाल हा गेल्या ३ दिवसापासून एक दृश्य बघत होता. एक गरीब बेघर म्हातारी दयनीय अवस्थेत एका झाडाजवळ बसून होती. तिचं वय होतं ८० वर्ष. ३ दिवसांनी शेवटी तो तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला जेवण आणि चहा देऊ केला. पण ती इतकी कमजोर होती की तिला ते खाता येईना. मग त्याने पुढे जे केलं ते आपण विचारही करू शकत नाही. साधारणपणे आपण भिकाऱ्याला भिक किंवा अन्न देऊन निघून जातो पण बी गोपालने तिची अवस्था बघून स्वतःच्या हातांनी तिला अन्न भरवलं.

तेलंगणाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी ‘हर्षा भार्गवी’ यांनी या प्रसंगाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि बघता बघता तो व्हायरल देखील झाला आहे. लोकांनी बी गोपालच्या कामाची प्रशंसा करत हा फोटो तब्बल ९ हजार पेक्षा जास्त वेळा शेअर केला आहे.  

या आज्जी कोण आहेत ?

या आजींच नाव आहे ‘बुचम्मा’. तिला ९ मुलं असूनही तिची काळजी घेणारं कोणीही नसल्याने तिची ही अवस्था झाली होती. सुदैव म्हणजे या घटनेनंतर तिची दाखल घेतली गेली आणि तिला आता एका आश्रमात ठेवण्यात आलं आहे.

या मोठ्या मनाच्या पोलिसाला बोभाटाचा सलाम !!