शेअर बाजारातले पहिले 'थोरले बाजीराव' असे ज्यांना म्हणता येईल असे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत संपत.आता ते आपल्यात नाहीत . २०१५ साली वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाले. बोभाटाच्या या मालिकेतला पहिलाच लेख चंद्रकांत संपत यांच्यावर लिहायचे कारण असे की ते आता बाजारात नसलेल्या जुन्या पिढीचे आदर्श समजले जातात.
आता साहजिकच तुम्ही विचाराल की जुनी पिढी म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे की सध्याचे बाजारातले मोठे खेळाडू म्हणजे मोठी 'गेम' करणारे गुंतवणूकदार सर्व उच्चशिक्षित आहेत. चंद्रकांत संपत यांची पिढी मात्र लौकीकदृष्ट्या फारशी शिकलेली नव्हती. पण कदाचित त्यामुळेच त्यांचे आडाखे बांधण्याचे नैसर्गिक कौशल्य तीक्ष्ण होते. वर्तमानपत्र आणि कंपनीच्या अनधिकृत माध्यमातून मिळणार्या माहितीच्या भरवशावर या पिढीचे तर्क आधारीत असायचे.







