१५ व्या शतकाच्या अखेरीस वास्को-दि-गामाने भारतात पाऊल ठेवले. त्यानंतर फ्रेंच, डच, ब्रिटीश वसाहतवाद्यांनी भारतात आपले बस्तान बसवले. या व्यापारी वसाहतींमध्ये अनेक तरुण अधिकारी भारत स्थाईक झाले. या अधिकाऱ्यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी अशी होती की भारतामध्ये त्यांच्याशी लग्न करणार कोण ?
काही वर्षांनी ही समस्या दूर करण्यासाठी गोव्याच्या पोर्तुगीज वसाहतीत केवळ विवाहोत्सुक तरुणींना एका बोटीने पोर्तुगालहून आणण्यात आले. हे सर्व तरुण अधिकारी पैशांनी गब्बर होते आणि येणाऱ्या मुली अशाच तरुणांच्या शोधात होत्या. या सर्व मुलींची हळूहळू तिथे लग्न पण झाली. पुढच्या काही वर्षात भारतातल्या तरुण अधिकाऱ्यांशी लग्न करण्याची फॅशनच युरोपात आली. अशा विवाहेच्छूक तरुणींना युरोपात फिशिंग फ्लीट म्हणून हिणवले जायचे, तर भारतात येऊन सुद्धा ज्यांची लग्न जमली नाहीत त्यांना युरोप मध्ये परत गेल्यावर ‘रिटर्नड एम्प्टीस’ या नावाने हिणवले जायचे.







