आता महाराष्ट्रातल्या या शहरात मिळणार घरपोच डीझेल !!

आता महाराष्ट्रातल्या या शहरात मिळणार घरपोच डीझेल !!

इंडिअन ऑईल कॉर्पोरेशनने पहिल्यांदाच चक्क डीझेल घरपोच देण्याची सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा पहिल्यांदा आपल्या पुण्यात सुरु होणार असून त्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागात सुरु होणार आहे. याबद्दल माहिती देताना IOCL ने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी ग्राहकांच्या सोईसाठी डीझेलची घरपोच सेवा सुरु करत असल्याचं सांगितलं आहे.

या पोस्ट मध्ये दिसत असलेल्या फोटोत तुम्ही ‘फुअल टँक’ पाहू शकता. नेहमीच्या पेट्रोल डीझेल पंपावर असतं तसच ‘इंधन वितरण यंत्र’ या गाडीला जोडलेलं दिसत आहे. हे यंत्र टँक मध्ये असलेल्या डीझेलला जोडण्यात आलेलं असून त्याद्वारे नेहमीच्या पद्धतीनेच डीझेल गाडीत भरण्याचं काम होईल. याला आपण फिरता डीझेलपंप म्हणू शकतो.

पेट्रोलची मागणी जास्त असताना डीझेलची निवड का झाली असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. याचं कारण म्हणजे पेट्रोल घरपोच देणं सुरक्षित नाही. त्यामुळे तूर्तास तरी डीझेलची निवड करण्यात आली आहे. आता या डीझेलची किंमत किती असेल ? घरपोच सेवा म्हटल्यावर याबदल्यात काही एक्स्ट्रा चार्जेस लागतील का ? सेवेसाठी कोणत्या क्रमांकावर फोन फिरवायचा ? याबद्दल तूर्तास माहिती मिळालेली नाही. ही माहिती लवकरच मिळेल.

या नव्या सेवेसाठी इंडिअन ऑईल कॉर्पोरेशनचं कौतुक केलच पाहिजे राव.