स्टॉक मार्केट मध्ये चांगला परतावा मिळतो म्हणून अनेकजण यामध्ये पैसे गुंतवतात. काही लोकांना यात खरोखर अफाट फायदा होतो. काही जण रंकाचे राव होतात, तर काहीजण रावाचे रंक! स्टॉकमध्ये नेमका कधी पैसा गुंतवायचा आणि कधी शेअर्स विकायचे याचे अचूक टायमिंग साधता आले की बस्स!
भल्याभल्या लोकांना स्टॉक मार्केटचा चांगलाच फटका बसतो. बुद्धिमत्ता आणि शेअर गुंतवणूक यांचा काही संबध आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा. कारण जगातील सर्वात बुद्धिमान समजला जाणारा व्यक्तीसुद्धा शेअर मार्केटच्या बाबतीत 'ढ' ठरला होता!!
गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा, गतीचे नियम सांगणारा आणि भौतिकशास्त्राचा संपूर्ण पाया रचणारा व्यक्तीला शेअर मार्केट कळेलच असे नाही. हो इथे आम्ही बोलतोय ते महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटनबद्दल. त्यांच्या बुद्धीमत्तेविषयी कुणालाही शंका नसली तरी स्टॉक मार्केट हा प्रांत मात्र त्यांचा नव्हता. असे आम्ही का म्हणतोय ते तुम्हाला पुढील लेख वाचल्यावर कळेलच.
१७२० साली इंग्लंडमध्ये ‘द साऊथ सी’ कंपनीच्या शेअर्सने चांगलीच उचल खाल्ली होती. त्या काळात इंग्लंडमधला हा सर्वात तेजीत असणारा स्टॉक होता. कंपनीला इंग्लंडचे सरकारी कर्ज हाताळण्यास मिळाल्यावर तर या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखीनच तेजी आली. ही खरीच खूप मोठी गोष्ट होती.
सगळीकडे या कंपनीचा बोलबाला होता. कंपनीच्या शेअर्सना चांगली मागणी होती. हवेचा रोख ओळखत न्यूटन यांनी या कंपनीत गुंतवणूक केली. सरकारी कर्ज हाताळणाऱ्या या कंपनीच्या स्टॉक प्राईसमध्ये अचानक १०% वाढ झाली होती.

