ही गोष्ट आहे वाट चुकलेल्या कांगारूंची. तुम्ही बरोबर वाचलंत, कांगारूच! कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा, पण गेल्या महिन्यात तो चक्क भारतात आढळून आला. हजारो किलोमीटर दूर असलेल्या ऑस्ट्रेलियातून हे इथपर्यंत कसे आले? उड्या मारत नक्कीच आले नाहीत! हे एक मोठे कोडे आहे. पण त्या निमित्ताने माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांना कसा वेठीला धरू शकतो हे समोर आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलात कुणा ड्रायव्हरला एका आडवाटेला कांगारूंची जोडी उड्या मारताना दिसली आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. नंतर अजून काही माणसे तिथे जमली आणि आश्चर्य, उत्सुकता, आनंदाच्या आरोळ्यांनी परिसर निनादला. या बघ्यांनी ही नवलाई आपल्या मोबाईल कॅमेर्यात टिपली आणि शेअर केली. त्यानंतर त्यांच्यापैकीच कुणीतरी फॉरेस्ट रेंजर्सना या कांगारूबद्दल कळवले. रेंजर्स त्यांच्या सुटकेसाठी निघाले. दरम्यान या लोकांनी कांगारूंना जमेल तसे खायला घातले. थोड्याच वेळात त्यांच्या सुटकेसाठी निघालेली वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम तेथे येऊन पोहोचली आणि त्यांनी या कांगारूंना ताब्यात घेतले. त्यांची नावे ॲलेक्स आणि झेवियर अशी ठेवली गेली.




