राग...दोनच अक्षरांचा शब्द आहे. पण ह्या छोट्याशा शब्दाचे दुष्परिणाम मात्र बरेच मोठे असतात. रागाच्या भरात माणूस कसा वागेल ह्याचा अंदाज बांधणेही खूप कठीणच म्हणा. आज हे सांगण्यामागचं कारण म्हणजे झालं असं की, एका माणसाचं त्याच्या बायकोसोबत भांडण झालं आणि रागाच्या भरात तो घर सोडून निघून गेला. बरं घर सोडून निघून गेलाय म्हणजे कोणत्या मित्राकडे गेला किंवा कोणत्या नातेवाईकांकडे गेला असेही नाही. तर रागाच्या भरात ह्या माणसाने चक्क ४५० किलोमीटरचा प्रवास पायी केला आहे. मजेशीर आहे ना सगळं.
बायकोशी भांडून हा माणूस चालत सुटला....किती किलोमीटर लांब गेला पाहा !!


हे गृहस्थ इटली मधील कोमो शहरातले. तिथे सध्या पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्यात ह्यांचं बायको सोबत भांडण झालं. मग काय?? रागाच्या भरात हे महाशय निघाले घराबाहेर. चालत चालत ते चक्क ड्रिएटिक किनारपट्टीवरील फानो या छोट्या गावात पोहोचले. कोमो ते फानो हे अंतर ४५० किलोमीटर इतके आहे. शिगेला पोहोचलेला राग एक न संपणारी ऊर्जा देत असावा असंच वाटतंय आता.
बरोबर एका आठवड्यानंतर रात्री २ वाजता फानो मधील पोलीसांनी ह्या गृहस्थांना आपल्या ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव झाली की ते मागचे आठ दिवस एकसारखे चालतच आहेत. रस्त्यात लोकांनी त्यांना खायला दिले तेवढेच त्यांनी खाल्ले होते.

गृहस्थांनी घरी झालेला प्रकार आहे तसा पोलिसांना सांगितला. पोलिसांनी कोमो पोलीस ठाण्यात संपर्क करून झालेल्या घटनेची शहानिशा केली. तेव्हा कळले की, त्यांच्या पत्नीने आठ दिवसापूर्वी आपला पतीची हरवल्याची तक्रार नोंदवली होती. महाशय जेव्हा खरं बोलताहेत अशी खात्री झाली तेव्हा त्यांच्याकडून फक्त लॉकडाऊनचे नियम मोडल्याबद्दल दंड वसुली केली. हा दंड फक्त आणि फक्त ३५००० रुपये इतका होता.
तर मित्रांनो, सगळं एकंदर मजेशीरच आहे ना. आत्ता आपल्याला हसायला येत असेल तरी आपण किती राग करावा आणि राग किती ताणावा हे आपल्याला कळलेच पाहिजे. रागामुळे नुकसान हे फक्त स्वतःचे होत असते. त्यामुळे रागावर नियंत्रण कसे ठेवायचे हे शिकणे फारच गरजेचे आहे.
लेखिका : स्नेहल बंडगर