या मालिकेत आम्ही भारत आणि जगभर झालेल्या, गाजलेल्या खूनखटल्यांचा मागोवा घेणार आहोत. ही घटना आहे आपल्याच देशातल्या तमिळनाडूमधली.
आपण देशभरातल्या वेगवेगळ्या खून आणि खटल्यांबद्दल बोभाटावर वाचले आहे. सर्वसाधारणपणे पोलिस कर्तव्यदक्षपणे तपास करतात आणि गुन्हेगारांना पकडतात. पण व्यक्ती तितक्या प्रकृती हे पोलिसदलालाही लागू पडते. काहीजणांचा अहंकार प्रसंगी निष्पांनाना अभय देण्याऐवजी त्यांच्याच विनाशास कारणीभूत होतो. आजचा हा लेख अशाच लोकांबद्दल आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी पोलीस करतात. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही अधिकार त्यांना आहेत. पोलीसांमुळे आपण सुरक्षित आहोत ही भावना जनतेच्या मनात असते, परंतु रक्षणकर्ते जर जीवावर उठले तर? जयराज आणि बेनिक्स इमॅन्युएल या पितापुत्राच्या बाबतीत तसेच घडले आहे. तुरुंगात केलेल्या अमानुष छळामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. नक्की काय आहे ही घटना, याबाबत आज आपण जाणून घेऊयात.
ही घटना तामिळनाडूच्या तुतीकोरीन जिल्ह्यात घडली. १९ जून २०२० ला रात्री ७:३० वाजता जयराजला(वय ५८) उपनिरीक्षक के. बालकृष्णन, निरीक्षक एस. श्रीधर, पोलिस हवालदार एम. मुथुराजा आणि इतर अधिकाऱ्यांनी कामराजर चौकातून उचलले. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी दुकान जास्त वेळ उघडे ठेऊन नियम मोडला या कारणामुळे त्यांना अटक झाली होती. वडिलांना पोलिसांनी नेल्याची माहिती मिळताच त्यांचा मुलगा बेनिक्स(वय३१) याने लगेच सथानकुलम पोलिस ठाणे गाठले. उपनिरीक्षक के. बालकृष्णन वडिलांना मारहाण करत असल्याचे पाहून बेनिक्सने आपल्या वडिलांना अटक का करण्यात आली आणि त्यांच्यावर कारवाई का केली जात आहे याबद्दल प्रश्न विचारले. त्याच्या आक्षेपामुळे पोलीस संतप्त झाले आणि त्यांनी बेनिक्सलाही मारहाण करायला सुरुवात केली. बेनिक्सने स्वतःचा बचाव करण्यासाठी हवालदाराला दूर ढकलले तेव्हा आरोपी पोलिस अधिकारी अधिकच चिडले.
