कानबाईचा रोट : खानदेशातल्या दिवाळी इतक्याच महत्वाच्या सणाची ओळख करून घ्या !!

लिस्टिकल
कानबाईचा रोट : खानदेशातल्या दिवाळी इतक्याच महत्वाच्या सणाची ओळख करून घ्या !!

खान्देशचा सर्वात मोठा सण म्हणजे कानबाई उत्सव!! त्यालाच अहिराणीत कानबाईना रोट असे म्हटले जाते. कानबाई माय म्हणजे पूर्ण खान्देशची आराध्य दैवत. कानबाई ही पार्वतीचेच रूप असल्याचे इथे मानले जाते. खान्देशात सर्वात जास्त पूजले जाणारे दैवत पण कानबाईच आहे. 

तर मंडळी, आज आपण याच आगळ्यावेगळ्या सणाबद्दल जाणून घेणार आहोत. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा मालेगाव, सटाणा या भागाला खान्देश असे म्हटले जाते. खान्देश नाव कसे पडले याच्या पण वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. काही सांगतात कान्हा म्हणजे कृष्णाच्या नावावरून कान्हदेश नाव पडले तर काही सांगतात कानबाई मातेचा प्रदेश म्हणून कान्हदेश. कालांतराने कान्हदेशला खान्देश म्हटले जाऊ लागले. 
 

कानबाईना रोट म्हणजे आमना खान्देशनी दिवाई. दिवाळीपूर्वी जशी घरची रंगरंगोटी केली जाते, घरभर साफसफाई होते,  तशीच तयारी कानबाईच्या रोटपूर्वी पण केली जाते.  या उत्सवासाठी कुठली तारीख किंवा तिथी ठरवलेली नसते.  नागपंचमी नंतर येणारा पहिला रविवार हा कानबाईच्या रोटचा दिवस असतो. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो.

तीन दिवस कानबाई आमच्या घरी आलेली असते.  तिच्या स्वागतासाठी पूर्ण गाव चकचकीत झालेले असते. तीन दिवसाच्या या सणाला कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी परत गावात येतात. या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस कितीही कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोटसाठी तो गावात येतोच! एकवेळ लगीनसराई, दिवाळीसारखे सण टळतील, पण कानबाई मायले पाठ कोणीच नई दावस.  परदेशात असणारेसुद्धा कानबाईसाठी गावात येत असतात. गावाला या तीन दिवसात जत्रेचे स्वरुप आलेले असते. अनेक दिवसांपासून भेटलेले मित्र एकमेकांना पुन्हा भेटत असतात. यामुळे सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. 

शनिवारी कानबाईचा रोट खऱ्या अर्थाने सुरू होतो. पहिल्या दिवशी ३ पिढ्यांचे कुटुंब एकत्र येते, सोबत गहू दळले जातात. 

दुसऱ्या दिवशी सगळी भाऊबंदकी एकत्र येते. मंडळी, राजकारणामुळे तुटलेल्या भाऊबंदक्या कानबाईच्या रोटमुळे वर्षानुवर्षाचे भांडण मिटून पुन्हा एकत्र आल्याची अनेक उदाहरणे खान्देशात सापडतील. या दिवशी सगळी भाऊबंदकी एकत्र येऊन एकाच ताटात जेवतात. यामुळे अनेकांचे हेवेदावे, मतभेद संपुष्टात येऊन पुन्हा एकत्र येऊन दुरावा नष्ट होतो. याच दिवशी रात्री जागरण असते. कानबाईचा दिवा रात्रभर डोळ्यात तेल घालून पेटता ठेवावा लागतो. यादिवशी गावाच्या बाहेर गेल्यामुळे जे सोबत मोठे झाले नाहीत अशा तिसऱ्या पिढीची मुले एकमेकांची ओळख करून घेतात. भाऊबंदकीतल्या सुनांची मैत्री होते. 

सोमवारचा तिसरा दिवस म्हणजेच कानबाई मायले निरोप देवाना दिन या दिवशी पूर्ण गावातून कानबाई मायची मिरवणूक निघते. आधी साध्या पध्दतीने मिरवणूक निघत असे, पण आता डिजे, बँडच्या तालावर वाजत गाजत कानबाई मायला निरोप दिला जातो. मात्र डिजेत कुठलीही इतर गाणी वाजवली जात नाहीत. कानबाईचीच लोकगीते रिमिक्स करून त्यांच्या तालावर गावकरी नाचत असतात. 

तसे पाहायला गेले तर ही लोकगीते, कानबाईच्या गवरणी म्हणतात ती गीते आणि भक्तांच्या माध्यमातून म्हटल्या जाणाऱ्या 'व्हया' हे मराठीतला एक वेगळा साहित्यप्रकार म्हणून उजेडात यायला पाहिजे. आचार्य अत्रेंनी आमच्या खान्देशच्या अभिमान असलेल्या बहिणाबाईंच्या कविता शोधून काढल्या आणि महाराष्ट्राला उपकृत केले तसेच हा एक नविन साहित्यप्रकार जगासमोर आला तर मराठी साहित्यात मोलाची भर पडेल.

श्रावणात पाऊस चांगला पडतो. या काळात नद्या वाहत्या असतात. नदीवर कानबाई मायला आमचा प्रदेश सुजलाम सुफलाम कर अशी प्रार्थना करून या उत्सवाचा समारोप होतो.

 

लेखक- वैभव पाटील