१९९९ साली पाकिस्तानने कारगिल युद्धात केलेली आगळीक भारताने चांगलीच जिरवली होती. या गोष्टीला आता २२ वर्षं झाली आहेत. कारगिल विजयात अनेक शूर आणि धाडसी सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. या युद्धात आपले ५२७ सैनिक शहीद झाले होते.
कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या त्यागाच्या आणि शौर्याच्या कथा आजवर अनेक वेळा तुम्ही वाचल्या असतील. कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणी शेरशाह या सिनेमातून सर्वांसमोर आली आहे. राजपूताना रायफल्सचे वीर सैनिक मेजर पद्मपाणी आचार्य यांची गोष्ट मात्र अजून लोकांपुढे आलेली नाही.
पाकी आक्रमणाला उत्तर देताना पद्मपाणी आचार्य यांना २८ जून १९९९ रोजी हौतात्म्य आले होते. कारगिलच्या तोलोलिंग येथे ते शहीद झाले होते. त्यांच्या याच शौर्याचा सन्मान आचार्य यांना मरणोत्तर महावीर चक्र हे पदक देऊन करण्यात आला होता. महावीर चक्र हे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे शौर्यपदक आहे.
आचार्य मूळ ओडिशाचे. मात्र ते हैदराबाद येथे लहानाचे मोठे झाले. तिथेच शिक्षण पूर्ण करून ते सैन्यात भरती झाले. १९९४ साली मद्रास येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी येथे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आता त्यांचा सैन्यासोबत प्रवास सुरु झाला होता. आता याच काळात त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.

