मंडळी, हिंदु धर्मग्रंथ, शास्त्रे आणि पुराणांमध्ये वेळोवेळी देवी-देवतांनी पृथ्वीवर मानवी रूपात अवतार धारण केल्याचे उल्लेख आहेत. आता हे अवतार खरोखरच पृथ्वीवर होऊन गेलेत की त्या फक्त दंतकथा आहेत? हा जमल्यास अभ्यासाचा, नाहीतर ज्याच्या त्याच्या श्रद्धा आणि विश्वासाचा विषय आहे. पण नेपाळमध्ये मात्र आजही एक अनोखी परंपरा प्रचलित आहे. जगातील एकमेव हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये चक्कं लहान मुलींना महाकालीचा अवतार म्हणुन पुजलं जातं. या मुलींना तिथे 'कुमारी देवी' म्हणुन संबोधलं जातं!
नेपाळमधील लोकांच्या समजुतीनुसार या कुमारी देवी त्यांना विविध आपत्ती आणि नैसर्गिक संकटांपासून वाचवतात. मंदिरात ठेऊन पुजल्या जाणार्या या मुलींना आपलं कुटूंब आणि वैयक्तिक जिवनाचा संपुर्ण त्याग करावा लागतो. १७व्या शतकापासून सुरू असलेली ही प्रथा आजही तितक्याच विश्वासाने तिथे पाळली जाते. ३ वर्षे वयापासून मासिक धर्म सुरू होईपर्यंत ती मुलगी त्या पदावरती राहते, आणि त्यानंतर दुसर्या मुलगीची कुमारी देवी म्हणून निवड केली जाते.

(स्त्रोत)
पण एखाद्या मुलीला कुमारी देवी म्हणून निवडण्याची ही प्रक्रियासुद्धा खुपच वेगळी आहे मंडळी. नेपाळमधील शाक्य आणि वज्राचार्य जातीतील मुलींना ३ वर्षे होताच त्यांना त्यांच्या कुटूंबापासून वेगळं केलं जातं. या सगळ्या मुलींना 'कुमारी' आणि 'अविनाशी' असं संबोधलं जातं. वेगवेगळ्या ३२ स्तरावर त्यांची परिक्षा घेतली जाऊन त्यातून एक कुमारी देवी निवडली जाते. यावेळी तिच्यात कुमारी देवी बनण्यासाठी आवश्यक असणारी सर्व लक्षणं असावी लागतात. तीच्या जन्म कुंडलीत असणारे ग्रह-नक्षत्रांची स्थितीही महत्वाची मानली जाते. म्हैस कापणे, राक्षसी मुखवटे घालून नृत्य करणे, असे प्रकार तिच्यासमोर केल्यानंतर जी मुलगी घाबरून रडणार नाही तिलाच कालीचा अवतार मानलं जातं.

(स्त्रोत)
निवड झाल्यानंतर या कुमारी देवींना सन्मानाने राजधानीत नेलं जातं. तीच्यासमोर पुजार्यांकडून प्राण्यांचे बळी दिले जातात. कुमारी देवी असेपर्यंत या मुलीला कुमारी घरामध्ये (मंदिरामध्ये) राहूनच आपलं शिक्षण आणि धार्मिक विधी पुर्ण करावे लागतात. सण उत्सवांवेळी वर्षातून फक्त १३ वेळा त्यांना बाहेर आणलं जातं आणि त्यांची नगरातून मिरवणूक काढली जाते. यावेळी शाक्य वंशाच्या लोकांनी तीची पालखी आपल्या खाद्यांवर घेतलेली असते, जेणेकरून तीचे पाय जमिनीला स्पर्श होऊ नयेत. लोक या कुमारी देवीचं दर्शन करणं शुभ मानतात. विशेष म्हणजे हिंदू आणि बौध्द अशा दोन्ही धर्मातून या देवीला तितकाच मान दिला जातो. नेपाळच्या तीन शाही साम्राज्यांची ती प्रतिनिधी असते. मासिक धर्म सुरू झाल्यानंतर कींवा एखाद्या कारणाने तिच्या शरिरातून रक्त वाहायला लागल्यास तीचं देवीचं स्थान संपुष्टात येऊन नवी कुमारी देवी मंदिरात प्रवेश करण्याआधीच तीला ते मंदिर सोडावं लागतं.

(स्त्रोत)
पदावरून बाजूला झाल्यानंतरही या कुमारी देवींना पवित्र मानलं जातं. तिथे त्यांना पेन्शन आणि राहायला आवास दिले जातात. पण तिथल्या समजूतीनुसार जो पुरूष कुमारी देवीशी लग्न करेल त्याचा मृत्यू लवकर होतो. याच कारणाने तिथल्या बहूतांश कुमारी देवींना आपलं संपूर्ण आयुष्य लग्नाविनाच व्यतित करावं लागतं.
कीतीही श्रध्देचा विषय असला तरी ३ वर्षांच्या अजाण वयात बदललेली या मुलींची ही ओळख त्यांना संपूर्ण आयुष्यभर पाठीशी घेऊन फिरावी लागते. सामाजिक मानसन्मान मिळाला तरी आपल्या वैयक्तिक जिवनाचा, आपल्या स्वप्नांचा, इच्छा - आकांक्षांचा चुराडा करून त्या जगत असतात.
या प्रथेबद्दल तुमचं मत काय आहे मंडळी? कमेंट करून आम्हाला जरूर कळवा...
