साधे सोपे अर्थसूत्र: एम्प्लॉइज स्टॉक ऑप्शन आणि त्याचे फायदे हे समजून घ्या

लिस्टिकल
साधे सोपे अर्थसूत्र: एम्प्लॉइज स्टॉक ऑप्शन आणि त्याचे फायदे हे समजून घ्या

A fool and his money soon part the company म्हणजे मूर्ख माणूस आणि त्याचा पैसा यांची ताटातूट व्हायला वेळ लागत नाही. जर तुमच्या हातात पैसे असतील तर तुम्ही अर्थसाक्षर असणे किती महत्वाचे आहे हे सांगणारा हा वाक्प्रचार आहे.'बोभाटा'च्या अनेक लेखातून आम्ही अर्थसाक्षरतेचा अप्रत्यक्ष प्रचार करतच असतो. या अर्थसाक्षरतेच्या प्रसारासाठी आम्ही 'साधे सोपे अर्थसूत्र' ही नवी लेखमालीका सादर करत आहोत. आपल्या रोजच्या व्यवहारात येणार्‍या अनेक आर्थिक संकल्पनांना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगाणारी ही लेख मालीका आहे.या मालीकेचे लेखक श्री अरुण केळकर हे व्यवसायाने निवृत्त चार्टर्ड अकाउंटंट आहेत.येणारा काळ ' फिनटेक रिव्होल्यूशन' चा आहे - आर्थिक व्यवहाराच्या क्रांतीचा- आहे. चला तर , अर्थसाक्षरतेकडे पहिले पाऊल उचलू या !

==========================================

साधे सोपे अर्थसूत्र भाग १: काय असणार आहे या मालिकेत? का आहे ही महत्वाची?

 

 

एम्प्लॉइज स्टॉक ऑप्शन हे प्रकरण तसं कंपनी आणि कर्मचारी दोघांच्याही फायद्याचं. पण हे नक्की काय, त्यात संभाव्य फायदेतोटे काय आणि तो पर्याय स्वीकारावा की नाही अशा काही प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखात खास बोभाटा वाचकांसाठी!!

एम्प्लॉइज स्टॉक ऑप्शन हा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेला एक हक्क असतो. यानुसार कर्मचारी आपल्या कंपनीचे ठरावीक शेअर्स, ठरावीक किमतीला एका विशिष्ट कालावधीत कंपनीकडून विकत घेऊ शकतात. कोणा कर्मचाऱ्याला किती शेअर्स मिळणार हे त्याच्या हुद्यावरून, सेवाकाळावरून ठरते. शेअर्सची किंमत योजना जाहीर 
होते त्यावेळच्या स्टॉक मार्केटमधील किंमतीपेक्षा कमी असते.
या योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
1) हा हक्क फक्त पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना मिळतो.
2) एक वर्षाहून अधिक काळ सलग सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा हक्क मिळतो.
3) हुद्दा, सेवाकाळ यावरून किती शेअर्स विकत मिळणार हे ठरते.
4) शेअर्सची विक्री किंमत कंपनी ठरवत असली तरी ती सेबीच्या मार्गदर्शक सूत्रानुसार ठरवली जाते
5) यानुसार विकत घेतलेले शेअर्स विशिष्ट कालावधीत विकता येत नाहीत, गहाण ठेवता येत नाहीत. या कालावधीला ’लॉक इन पिरिअड’ असे म्हणतात.

 एम्प्लॉइज स्टॉक ऑप्शन योजना कंपन्या आणि कर्मचारी दोघांना फायद्याच्या असतात. वाढीव पगाराऐवजी कंपन्या कर्मचाऱ्यांना हा हक्क देतात. त्यामुळे त्यांचा वेतनखर्च कमी राहतो, तर कर्मचाऱ्यांना बाजारभावाच्या तुलनेत कमी भावात शेअर्स मिळतात एवढेच नव्हे, तर त्यावेळी त्यांना त्यावर आयकरही भरावा लागत नाही.

कंपन्यांसाठी ह्यापेक्षा महत्त्वाचे हे, की अशा योजनांमुळे कर्मचाऱ्यांच्या मनात कंपनीविषयी मालकीची भावना निर्माण होते, कंपनीचा नफा वाढला, की आपला लाभ वाढेल या विचाराने ते अधिक मन लावून काम करतात. याशिवाय कर्मचाऱ्यांची उलाढाल म्हणजे एक कर्मचारी जाऊन त्याजागी दुसरा कर्मचारी येणे, ज्याला अँट्रिशन ((atrition)) असे म्हणतात, ती कमी होते. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा कंपनीला मिळत राहतो.

ज्या उद्योगात कर्मचाऱ्याचे एखाद्या विषयासंबंधीचे विशेष ज्ञान वा त्यातील कौशल्य याला महत्त्व असते. अशा उद्योगातील कंपन्या आपल्याकडे कर्मचारी टिकून राहावेत म्हणून भल्या मोठ्या पगाराव्यतिरिक्त वेगवेगळी आमिषे दाखवत असतात. एम्प्लॉइज स्टॉक ऑप्शन हे त्यांपैकी एक आहे.

   मग यात नवल ते काय? नवल हे की या योजनेची सुरुवात इन्फोटेक बूमच्या काळात अमेरिकेत झाली आणि भारतात इन्फोसिस या कंपनीने भारतात सर्वप्रथम राबवली. त्याचा परिणाम असा झाला की तिचे कर्मचारी एका रात्रीत लखपती-करोडपती झाले. 


    ज्या दराने, ज्या किमतीला कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना या योजनेनुसार शेअर्स विकत घेण्याचा हक्क देते, त्या किंमतीला एक्सरसाइज प्राइस असे म्हटले जाते. 

 लॉक इन पिरिअड संपल्यावर कर्मचारी शेअर्स विकू शकतात. त्यावेळचा बाजारभाव आणि एक्सरसाइज प्राइस यातील फरक हा त्यांचा फायदा असतो. आणि असे शेअर्स विकल्यावर त्यांचे आयकर दायित्व ठरते; तोपर्यंत नाही.  

ज्या कंपन्यांच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये खरेदी-विक्री होत असते. त्या अशा योजना राबवतात. कारण कर्मचाऱ्यांना त्यांनी विकत घेतलेले शेअर्स स्टॉकमार्केटमध्ये विकता येतात.


पण नवीन स्थापन झालेल्या कंपन्यासुद्धा अशा योजना राबवतात. कारण त्यांना गलेलठ्ठ पगार देणे शक्य नसते, पण चांगले कर्मचारी तर हवे असतात. कर्मचारी अशा कंपन्यांच्या कमी पगार पण मोठा स्टॉक ऑप्शन या अटी स्वीकारतात, कारण त्यांना शेअर्स नगण्य किमतीला मिळणार असतात आणि त्यांची अशी धारणा असते, की कंपनीचे भवितव्य उज्ज्वल आहे आणि कंपनीचे शेअर्स जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये खरेदी- विक्री केले जाऊ लागतील तेव्हा त्यांना खूप चांगला भाव मिळेल.


येथे कर्मचाऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा द्यावासा वाटतो. तो असा,की एक्सरसाइज प्राइसने शेअर्स खरेदी केल्यानंतर काही विशिष्ट काळ ते विकता येत नाहीत. पण जेव्हा ते विकायला काढले जातील तेव्हा त्याची किंमत स्टॉकमार्केटमध्ये ठरणार, जी एक्सरसाईज प्राइसपेक्षा कमी सुद्धा असू शकते. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. 

अर्थात, माहिती देणे हे आमचे काम आहे. काळ-वेळ-कंपनीची सद्यस्थिती पाहून एम्प्लॉइज स्टॉक ऑप्शन स्वीकारावा की नाही हे ज्याने-त्याने ठरवावे लागेल!!