मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिलाने या पत्राद्वारे केलंय त्यांच्या मुलीचं या जगात स्वागत : वाचा पत्राचा भावानुवाद..

मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिलाने या पत्राद्वारे केलंय त्यांच्या मुलीचं या जगात स्वागत : वाचा पत्राचा भावानुवाद..

मार्क आणि प्रिसिलाला दुसरी मुलगी झालीय आणि त्यांनी तिचं नांव ठेवलंय –“ऑगस्ट”. आता ऑगस्ट जन्मात जन्मलेल्या या मुलीच्या नावावरून सोशल मिडियावर बरेच जोक्स चालू झालेयत. पण त्याचसोबत या दोघांनी तिला लिहिलेलं पत्रही तितकंच चर्चेत आहे. या दोघांनी यापूर्वी त्यांच्या पहिल्या मुलीच्या-“मॅक्स’च्या जन्माच्या वेळेस तिलाही असंच एक पत्र लिहिलं होतं. एका सुंदर, निरोगी, शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध आणि विज्ञान-तंत्रज्ञानानं प्रगत असलेल्या जगाची आशा करणारं हे पत्र खरंच सुंदर आहे..

========================================================

प्रिय ऑगस्ट,

या जगात तुझं स्वागत आहे! मोठी होऊन तू कोण होशील हे पाहण्यासाठी तुझी  आई आणि मी उत्सुक आहोत.

जेव्हा तुझी बहीण जन्माला आली, तेव्हा आम्ही ज्या जगात ती आणि आता तू वाढणार आहात आणि जिथं चांगले शिक्षण, कमी रोगराई, मजबूत समाज आणि अधिक समानता असेल, अशा जगाविषयीचं एक पत्र  लिहिलं होतं. तेव्हा आम्ही असं लिहिलं होतं की विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्हीं गोष्टींतल्या प्रगतीमुळं तुमची पुढची पिढी आमच्या पिढीपेक्षा खूपच चांगलं जीवन जगू शकेल आणि  हे घडण्यासाठी  आम्हांला आमच्या जबाबदारीचा वाटा उचलायला हवा.  ठळक बातम्या नेहमी चुकीच्या गोष्टीवर केंद्रित होत असल्या तरीही या सकारात्मक गोष्टींकडे लोकांचा कल नक्की असेल असा आम्हांला अजूनही विश्वास आहे. त्यामुळंच आम्ही तुमच्या पिढीबद्दल आणि भविष्याबद्दल आशावादी आहोत.

पण मोठं होण्यावर  लिहिण्याऐवजी आम्हाला तुझ्या बालपणाबद्दल बोलायचं आहे.  जग हे एक खूप गंभीर असू शकतं. म्हणून बाहेर जाण्यासाठी आणि खेळण्यासाठी वेळ काढणंही महत्वाचं आहे.

मोठी झालीस की तू तुझ्या कामात किंवा इतर गोष्टींत व्यग्र होशील.  मला आशा आहे की तू तेव्हा  सर्व फुलांच्या सुगंधाचा आस्वाद  घेण्याकरता वेळ काढशील आणि तुला हवी असलेली सर्व पानं तू गोळा करशील. मला अशीही आशा आहे की तू तुझ्या आवडत्या डॉ. सिअसची यांची पुस्तकं इतक्या वेळा वाचशील की तू तुझ्या स्वत:च्या  Vipp च्या Vipper बद्दलच्या कथा शोधून काढशील.  मला आशा आहे की तू मॅक्ससोबत इतक्या वेळा मेरी गो राऊंड खेळशील की तू तिथल्या सगळ्या रंगांच्या घोड्यांवर तुझं बसून झालेलं असेल. मला आशा आहे की तू आपल्या लिव्हिंगरूममध्ये आणि अंगणात मनसोक्त हुंदाडशील आणि मग थकून खूप सार्‍या डुलक्या घेशील. मला वाटतं की तू छानपैकी झोपणारी मुलगी होशील आणि मग आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला तुझ्या स्वप्नातसुद्धा जाणवत राहील.

स्रोत [ऑगस्टची बहीण मॅक्स आता चांगलीच मोठी झालीय..]

बालपण जादूभरं असतं आणि  आपल्याला आयुष्यात बालपण फक्त एकदाच अनुभवायला मिळतं. त्यामुळं  भविष्याबद्दल तू  खूप चिंता करू नयेस. तुझ्या भविष्याची काळजी करायला आम्ही आहोत आणि तू व तुझ्या पिढीतल्या मुलांसाठी हे जग आणखी छान बनावं यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

ऑगस्ट, आम्ही तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो आणि आम्ही तुझ्यासोबतच्या जीवनप्रवासाच्या मोहिमेसाठी खूप उत्सुक आहोत. आम्ही तुला आनंदमयी, प्रेमभरल्या आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि तू तुझ्या आगमनाने आमच्यासाठी अशाच आयुष्याच्या आशा पल्लवित केल्या आहेस.

 

सस्नेह,

आई आणि बाबा