१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हाचे व्हॉईसरॉय म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन आपल्याला माहिती आहेत. प्रिन्स चार्ल्स याचे ते घनिष्ठ मित्र. रॉयल नेव्हीमध्ये ते अधिकारी होते. हिंदुस्थानची भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेली फाळणी त्यांच्याच काळात घडली.
लॉर्ड माऊंटबॅटन भारताचे व्हॉईसरॉय असताना त्यांना राजा सहावा जॉर्ज याचे भारतातले प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले होते. राजाच्या वतीने कारभार करण्याचा त्यांना अधिकार दिलेला होता. वास्तविक माऊंटबॅटन स्वतः ही जबाबदारी स्वीकारायला फारसे उत्सुक नव्हते. भारताचं स्वातंत्र्य त्यावेळी दृष्टिपथात आलं होतं आणि इंग्रजांकडून भारतीयांकडे सत्तेचं हस्तांतरण माऊंटबॅटन यांच्या देखरेखीखाली होणार होतं. पण हे स्वातंत्र्यही सुखासुखी पदरात पडलं नाही. त्याला फाळणीचं आणि त्यातून उद्भवलेल्या हिंदू-मुसलमान दंग्यांचं ग्रहण लागलं. त्याआधीपासूनच हिंदू आणि मुसलमान यांच्यातला तणाव वाढायला लागला होता. त्यामुळे माऊंटबॅटन यांनी देशाचं विभाजन १९४८ ऐवजी १९४७ मध्ये करण्याचं ठरवलं. पण तरी जे व्हायचं ते झालंच. फाळणीमुळे लक्षावधी लोक जिवाला मुकले, तितक्याच निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला. भारत सोडताना फाळणीची कटू घटना ब्रिटिशांच्या खात्यात जमा झाली.



