प्रवासात पाकीट हरवणं किंवा चोरी जाणं यापेक्षा वाईट गोष्ट नाही. जर पाकिटात आपले सर्व महत्वाच्या गोष्टी म्हणजे आधार कार्ड, पॅनकार्ड, ATM कार्ड असतील तर मग विचारूच नका. मंडळी असच काहीसं घडलं दिल्ली मध्ये राहणाऱ्या गुरप्रीत सिंग बरोबर.
गुरप्रीत सिंग ‘केंद्रीय सचिवालय’ (Central Secretariat station) स्टेशन पासून लाजपत नगर पर्यंत मेट्रोने प्रवास करत होता. मेट्रो मधून बाहेर पडल्यावर त्याला लक्षात आलं की आपलं पाकीट हरवलं आहे. त्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांना गाठलं. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्याला त्याचं पाकीट शोधण्यासाठी मदत केली.

मेट्रो मध्ये शोधाशोध करूनही पाकीट काही सापडलं नाही. शेवटी गुरप्रीतला जाणवलं की आपलं पाकीट काही आपल्याला परत मिळणार नाही. भौ एकदा हरवलेलं पाकीट पुन्हा सापडणं म्हणजे दुर्मिळ गोष्ट असते. ही घटना अनेकांसोबत घडली असेल पण गुरप्रीतच्या गोष्टी मध्ये एक ट्वीस्ट होता राव.
१० दिवसानंतर
पाकीट मिळणार नाही हे ठरवून मोकळा झालेला गुरप्रीत घरी आलेल्या एका पार्सलने चकित झाला. १० दिवसांनी गुरप्रीतच्या घरी एक पार्सल आलं. या पार्सल मध्ये त्याचं हरवलेलं पाकीट त्यातील एकूण एक वस्तूंसहित त्याला मिळालं होतं. आधारकार्ड, मेट्रो कार्ड, दोन डेबिट कार्ड आणि ५१६ रुपये असा सगळा ऐवज पर्सल मध्ये होता.
मंडळी गुरप्रीतने या अनोळखी माणसाचे फेसबुक पोस्ट मार्फत आभार मानले आहेत. पण हा पार्सल पाठवणारा ‘बडे दिल वाला’ माणूस आहे तरी कोण ?
नोएडाच्या सिद्धार्थ मेहता नामक व्यक्तीने हे पुण्याचं काम केलं होतं. त्याने पार्सल बरोबर एक पत्र सुद्धा पाठवलं होतं. या पत्रात त्याच्या एकूण वस्तूंची लिस्ट आणि एक मोलाचा सल्ला दिला होता. हा सल्ला म्हणजे ‘पुढच्यावेळी थोडं जपून राहा.’
कसं आहे ना, सगळ्यांनाच सिद्धार्थ मेहता सारखे माणसं भेटत नसतात त्यामुळे आपल्या पाकिटाची काळजी घ्या.
