ज्यांनी आपली ओळख 'अरण्य ऋषी' म्हणून सार्थ केली असे मारुती चितमपल्ली वयाच्या ९३ व्या वर्षी बुधवार दिनांक १८ जून २०२५ रोजी निधन पावले.
आपला मोक्ष कशात आहे हे ज्याला वेळच्यावेळी कळतं त्याचा आयुष्य कृतार्थ होतं.अशा भाग्यवंता पैकी मारुती चितमपल्ली होते. आपल्या आनंदाचं निधान,ठेवा वनविद्येत आहे हे त्यांना वेळीच उमगले आणि मोहमयी दुनिया कडे पाठ करून आ जन्म रानावनात राहिले. हे आयुष्याचे संचित त्यांनी भरभरून वेगवेगळी पुस्तक लिहून खुलं केलं. विशेष म्हणजे तरीसुद्धा चित्तमपल्ली हे एकारले वा माणूस घाणे झाले नाहीत. उलट नवनवीन तरुण मुलांना या क्षेत्राकडे वळवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला.
त्यांचे भाग्य इतके थोर की,त्यांच्या सुरुवातीच्या लेखनाला नरहर कुरुंदकर सारख्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा राहिला त्यामुळे त्यांना ज्ञानातील कवाडे सहज उघडत गेली.त्याचं उदाहरण म्हणजे नांदेडच्या यज्ञेश्वर शास्त्री यांच्याकडून त्यांना संस्कृतचे धडे मिळत गेले. आणि संस्कृत मधील कधीही न संपणार धन त्यांना खुलं झालं! त्याचा आणखी एक फायदा म्हणजे संस्कृतच्या खाचा खोचा वेळेतच आणि विनासायास कळल्यामुळे इतर भाषा त्यांना सहज वश झाल्या. एवढं असून सुद्धा त्यांचं लिखाण निरस वा जडजंबाल न होता सर्व सामान्याला कळेल असं होतं आणि वनविद्येतील जाणकारांना देखील त्याची दखल घ्यावीशी वाटली. म्हणून तर त्यांना पक्षी तज्ञ पंडित सालीम अलीनी जशी दाद दिली तशी सर्वसामान्य वाचकाने देखील दिली. कारण त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या निघत राहिल्या. हे कशाला, एरवी कोश म्हटलं की त्याची आवृत्ती एकदाच कारण शेवटी तो संदर्भासाठी वापरला जातो. पण चितमपल्लींच्या पक्षी कोशाला दोन-तीन आवृत्त्या निघण्याचं भाग्य लाभलं. एरवी पक्षी अभ्यासकांच्या हातात सालीम अली यांची पुस्तकं असायची पण नंतर महाराष्ट्रात तरी मराठी अभ्यासकांत पक्षी कोश सर्रास दिसायला लागला. हे पाहून खुद्द सालीम अली यांनी म्हटलं,"चेला असावा तर असा!"तेव्हा चितमपल्ली यांनी म्हटलं होतं "हा माझा बहुमान मला पद्मश्री पेक्षाही मोठा वाटतो"- योगायोग बघा आयुष्याच्या संध्याकाळी का होईना त्यांना पद्मश्री देखील मिळालीच...
****
चितमपल्ली यांच्याकडे स्वतः अनुभवलेलं प्रचंड ज्ञानाच तुडुंब कोठार भरलेलं होतं. त्यांच्या लेखात त्याची लय लूट असे आहे.
पण एरवी सुद्धा बोलता बोलता काही गोष्टी सहजपणे सांगत.या घटकेला आठवणाऱ्या दोन गोष्टी सांगतो. कुत्र्यांना माकडांची शिकार करणे अर्थात त्यांचं मास आवडतं. पण माकड सहजपणे त्यांना सापडत नाहीत. अशावेळी कुत्री त्यांचा असा पाठलाग करतात की नंतर माकडांनी झाडांचा आश्रय घ्यावा.मग कुत्री झाडाच्या भोवती रिंगण घालतात आणि गोल गोल फिरू लागतात. बिचारी माकडं ही कुत्री कधी आणि कशी जातात यावर लक्ष ठेवायला लागतात. दृष्टी गोल गोल फिरल्याने त्यांना चक्कर येते आणि ती खाली पडतात. अर्थात मग कुत्र्याला भक्ष आयतेच मिळते ... याबाबत कोणी त्यांना म्हणे की माकडं शहाणी का होत नाहीत?
'माणसात आणि माकडात हाच फरक आहे' -इती चितमपल्ली.
****
अशीच आणखी एक गोष्ट.
उंदराना अंडी फार आवडतात. पण ती नाजूक असल्यामुळे त्यांना ती पळवणे कठीण जातं.अशावेळी एक उंदीर पाठीवर पडतो आणि छातीशी अंडं धरून राहतो. मग दुसरा उंदीर त्या उंदराची शेपटी धरून त्याला ओढत सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो.आणि अर्थातच मग दोघेजण अंड्याचा चट्टा मट्टा करून टाकतात.. हे सांगून चितमपत्ल्ली सांगत या उंदरांचा बुद्ध्यांक अजून तरी शोधता आलेला नाही .!
अशी शहाणीव आणि त्याच्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्या माहीत देखील असतील.त्याचा संग्रह आता करायला हरकत नाही.
बाकी त्यांची पुस्तक आणि त्यांचं वेगळं असलेलं आत्मचरित्र 'चकवा चांदणं'ते आपल्यासाठी ठेवूनच गेलेले आहेत. केव्हाही त्याची पान उघडावी त आणि आपल्याला ठाऊक नसलेल्या जगाचं दर्शन होऊन अचंबित होऊन जावं.हा अक्षय ठेवा आहे.
-रविप्रकाश कुलकर्णी.
