इच्छा तेथे मार्ग असं म्हटलं जातं, पण हा मार्ग चोखाळणं वाटतं तितकं सोपं नसतं. त्यातही नोकरी आणि स्वत:चा उद्योग अशा दोन्ही दरडीवर पाय ठेवून चालणं म्हणजे किती मोठे आव्हान! पुण्यातील एका महिलेने हे आव्हान समर्थपणे पेलून दाखवले आहे. कोशिंबीरीसारख्या छोट्याशा तोंडलावणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थातून ती वर्षाला लाखो रुपये कमवते. कोशिंबीर किंवा सलाद या पौष्टिक पदार्थाची गरज अगदी मधुमेही रुग्णांपासून ते फिटनेस फ्रिक लोकापर्यंत सगळ्यांनाच असते. तशी अगदी सोपी आणि छोटी गोष्ट असली तरी ती वडापाव, मिसळ किंवा बर्गर-पिझ्झाप्रमाणे चटकन उपलब्ध होत नाही. हीच तफावत ओळखून पुण्याच्या मेघा बाफना यांनी आधी छोट्या ऑर्डरींपासून या उद्योगाला सुरुवात केली. अर्थात, गरज लक्षात आली म्हणून त्यावर काम सुरु केलं आणि यश मिळालं असं होत नाही. त्यासाठी सातत्य, कष्ट आणि महत्वाची असते ती आवड.
मेघा नववीत असतानाच त्यांना एका मोठ्या ऑपरेशनमधून जावं लागलं. १८ महिने अंथरुणावर खिळून राहिल्यानंतर त्यांना आरोग्याची खरी किंमत कळाली होती. त्यातही त्यांच्या आरोग्याबाबत पुढेही काही गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात असा धोक्याचा इशारा डॉक्टरांनी आधीच देऊन ठेवल्याने त्या आपल्या आरोग्याबाबत अधिकच सजग झाल्या. काही काळाने त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सोबत आर्थिक स्वावलंबनासाठी म्हणून त्या नोकरी करू लागल्या. इतर सहकाऱ्यांप्रमाणे त्यांना कॅन्टीनचं खाणं झेपलं नसतं म्हणून त्या आवर्जून घरूनच डबा घेऊन जात. त्यांच्या या डब्यात दररोज न चुकता समाविष्ट असणारा पदार्थ म्हणजे सलाद! त्यांच्या डब्यातील या सलादची चव त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनाही आवडू लागली. मुळातच महत्वाकांक्षी असणार्या मेघा यांना यात एक नवी संधी दिसली आणि त्यांनी सलाद बनवून ते पुरवण्याचा व्यवसाय का करू नये अशा विचाराने काम सुरू केले. तिच्या सहकाऱ्यांनाही सलाद हवेच होते. फक्त सहा ऑर्डर्सपासून सुरुवात झाली. यासाठी गुंतवणूक खर्च होता फक्त ३५०० रुपये. या सहा ग्राहकांच्या माध्यमातून आणखी नवे ग्राहक जोडले गेले आणि पाहता पाहता दिवसाला ३०० ऑर्डर्सपर्यंत हा व्यवसाय वाढला. माउथ पब्लिसिटी हाच त्यांच्या व्यवसायाचा मुख्य आधार राहिला आहे. त्यांनी कधीही आपल्या व्यवसायाचे कोणत्याही माध्यमातून पेड प्रमोशन केले नाही असे त्या म्हणतात.

