११ मर्सिडीज, ३ ऑडी, ३ रोल्स रॉईल, २ जॅग्वार कोट्यावधीची संपत्ती एवढी स्थावर जंगम मालमत्ता कोणाची असेल असं तुम्हाला वाटतं? काही बडी नावं लगेच तुमच्या मनात येऊन गेली असतील. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं, की ही मालमत्ता बंगळूरमधल्या एका न्हाव्याची आहे तर तुमचा विश्वास बसेल ?
विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. हेअर ड्रेसर असलेला रमेशबाबू कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक आहे. आता तुम्ही म्हणाल की हा डोक्यावरून कात्री फिरवणारा करोडोंचा मालक कसा? याची कथासुद्धा रंजक आहे.
लहानपणी वडिलांच्या मृत्यूनंतर शिक्षण अर्धवट सोडून रमेश बाबूला केशकर्तनाचा वडिलोपार्जित व्यवसाय करावा लागला. १९९४ साली त्यांनी एक ओमनी कार विकत घेतली पण कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे रमेशबाबूंना ती कार भाड्याने द्यावी लागली आणि इथूनच त्यांना गाड्या भाड्याने देण्याचा नवा व्यवसाय करण्याची आयडिया सुचली.
त्याकाळात सगळ्यांकडे गाड्या नव्हत्या म्हणून लोक कार भाड्याने घ्यायचे. त्यामुळे रमेशबाबूंचा व्यवसाय वाढू लागला आणि पाहता पाहता गाड्यांची संख्याही वाढत गेली. पण एवढ्यावरच न थांबता रमेशबाबूंची मोठी उडी अजून बाकी होती. रमेशबाबूंनी सेलिब्रेटींसाठी तसेच बड्या हॉटेल्ससाठी लागणाऱ्या गाड्या पुरवण्याचं काम सुरु केलं. यासाठी त्यांनी बीएमडब्लू, मर्सिडीज, रोल्स रॉईल अश्या महागड्या गाड्यासुद्धा खरेदी केल्या.
रमेशबाबूंच्या ताफ्यात आज एकूण १५० आलिशान गाड्या उभ्या असून यात ११ मर्सिडीज, ३ ऑडी, ३ रोल्स रॉईल, ३ जॅग्वारचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ३.२ कोटी रुपयांची ‘मर्सिडीज मेबॅक एड-६००’ ही शाही कार खरेदी केलीय. देशभरात ही कार फक्त विजय मल्या आणि एका बिल्डरकडेच होती, पण आता यात तिसरं नावसुद्धा जोडलं गेलं आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे बराक ओबामांच्या भारत भेटीच्यावेळी रमेशबाबूंचीच कार वापरली गेली होती.
एवढी मालमत्ता असून सुद्धा रमेशबाबू आजही रोज आपल्या सलूनमध्ये जाऊन पाच तास काम करतात. रमेशबाबू यांचा एकच बिझनस मंत्र आहे- "दृढनिश्चय आणि कष्ट हेच तुमच्या आयुष्याचे कंगवा आणि कात्री आहेत." त्यांच्या या वाक्याने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
