भारतातली ही नदी चक्क कुठल्याच समुद्राला मिळत नाही, मग ही नक्की संपते कुठे आणि का?

भारतातली ही नदी चक्क कुठल्याच समुद्राला मिळत नाही, मग ही नक्की संपते कुठे आणि का?

नदी शेवटी समुद्राला मिळते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. भारतातल्या नद्या अरबी समुद्र किंवा बंगालच्या खाडीत जाऊन मिळतात. पण भारतात एक अशी नदी आहे जी कोणत्याही समुद्राला मिळत नाही.  इतकंच काय, तिचं नांव आणि  पाण्याची चव पण बदलते. काय म्हणता, कधी ऐकलं नाही या नदीबद्दल? या नदीचं नाव आहे ‘लुनी’. लुनी समुद्राला मिळत नाही, तर मग कुठे लुप्त होते ? चला तर या गूढ नदीबद्दल जाणून घेऊया...

लुनी हे नाव संस्कृतच्या लवणगिरी (खारी नदी) नावावरून आलं आहे. लुनी नदी राजस्थानच्या अरवली पर्वतरांगांमधल्या (अजमेर) ‘नागा हिल्स’ मधून उगम पावते. या भागात लुनीला ‘सागरमती’ म्हणतात. उगमापासून १०० किलोमीटरपर्यंत ही नदी गोड्यापाण्याची नदी असते. पुढे ती बारमेरपर्यंत पोहोचल्यानंतर तिथल्या खऱ्या भूमीमुळे तिचं पाणीही खारं होतं. म्हणूनच पुढे तिचं नाव बदलून लुनी असं होतं.

स्रोत

राजस्थानच्या नागौर, पाली, जोधपुर, बारमेर, जालोर भागातून ही नदी दक्षिण पश्चिमेला गुजरातमध्ये वळते. गुजरातमध्ये येऊन या नदीचा चक्क अंत होतो. लुनी लुप्त होते ती कच्छच्या रणमध्ये..
कोणत्याही समुद्राला मिळण्याआधी ती कच्छच्या वाळवंटात नाहीशी का होते ?

लुनीचा प्रवास राजस्थानच्या वाळवंटी भागातून होतो. या भागात तापमान प्रचंड असल्याने आणि सोबतच कमी पावसामुळे नदीला प्रवाही ठेवण्यासाठी येणारं पाणी वारंवार खंडित होत राहतं. हे झालं एक कारण. दुसरं कारण आहे नदीचं रुंदावत जाणारं पात्र. वाळवंटी भागातून वाहताना लुनीला जास्त खोली गाठता येत नाही. त्यामुळे होतं असं की नदी पसरत जाते. आणि एक वेळ अशी येते की नदीत पाणीच उरत नाही.

स्रोत

तर मंडळी, भारतातल्या एकमेव लुप्त होणाऱ्या नदीची अशी होती कहाणी. लुनी नदी पहायची असेल तर मान्सूनचा काळ सर्वात योग्य मानला जातो. मान्सूनमध्ये बारमेरला लुनीचं मोठं पात्र पाहायला मिळतं. किंवा मग पावसाळ्याच्या थोडं आधी मार्च महिन्यात बारमेरच्या थर महोत्सवाला भेट देऊन सुद्धा तुम्हाला लुनी पाहता येईल.

काय मग, पुढच्यावर्षी जाणार का ??

 

आणखी वाचा :

पैजेवर सांगतो हे ठिकाण भारतात आहे यावर तुमचा विश्वासच बसणार नाही...पाहा बरं कुठे आहे हे!!

बैकाल सरोवर : जगातील सर्वात खोल आणि प्राचीन सरोवर !!