राजस्थान पोलिसात नीना सिंग यांचे नाव खूप अदबीने घेतले जाते. आयपीएस अधिकारी नीना सिंग या राजस्थान पोलिस खात्यातल्या पहिल्या महिला आयपीएस आहेत आणि त्यांच्या कामगिरीने नुकतेच त्यांना डीजी पदही मिळाले आहे. राजस्थान पोलिसांच्या इतिहासातील पहिल्या महिला डीजी म्हणून त्यांनी काम सुरू केले आहे. त्या काळात पोलीस दलात येऊन पुरुषांच्या बरोबरीने काम करताना त्यांना अनेक आव्हाने आली. पण त्यांची कामात जिद्द आणि चिकाटी पाहून खुद्द मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्यांचे कौतुक केले. इतक्या मोठ्या पदावर पोहोचणाऱ्या नीना सिंग यांची यशोगाथा अनेकांना प्रोत्साहन देणारी आहे. त्यांच्या कारकिर्दीची ओळख आज थोडक्यात करून घेऊयात.
राजस्थानमध्ये नीना सिंग या कार्यरत असल्या तरी त्या मूळच्या बिहारमधल्या पाटणाच्या आहेत. त्यांचा जन्म ११ जुलै १९६४ साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पाटणा येथे झाले. पाटणा महिला महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या. त्यांनी जेएनयू, दिल्ली येथून मास्टर्स केले.



