तुम्ही जर फेसबुक किंवा स्नॅपचॅट नावाच्या ग्रहावर राहत असाल तर तुमच्या आजूबाजूला Sarahah.com या अॅपची लिंक फिरताना तुम्ही बघितली असेलच. नसेल तर तुम्ही नक्कीच पुरातन काळात जगात आहात राव...असो. काय आहे हा अॅप? कशाला हवा झाली आहे याची? फेसबुक कमी होतं की काय म्हणून हे नवीन खूळ आलंय ?
राव, आधी बघूया हा अॅप आहे तरी काय?

मंडळी समोरच्या माणसाला आपल्या मनातलं सांगायचं तर आहे, पण त्याच्या मैत्री सुद्धा गमवायची नाही? मग हा अॅप तुमच्यासाठी बेस्ट आहे. सराहा हा अरेबिक शब्द असून याचा अर्थ होतो ‘प्रामाणिकपणा’ आहे. म्हणजे प्रामाणिकपणे दिलेली कबुली. या अॅपवर तुम्ही अगदी कोणत्याही माणसाला मग ती अनोळखी असली तरी मेसेज करू शकता. याचा फायदा म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट नावाची भानगड इथे नाही.
कसं इंस्टॉल कराल ?
अॅप स्टोअर तसेच गुगल प्ले स्टोअरवर सराहा तुम्ही डाऊनलोड करू शकता. त्यामुळे अँड्रॉइड आणि अॅपल अशा दोन्ही सिस्टीमवर तुम्हाला हे अॅप वापरता येईल. फक्त ५ एमबी मेमरी असल्याने तुमच्या मोबाईलमधल्या खूप कमी जागेत हा अॅप फिट बसतो.
एकदा अॅप इंस्टॉल झाल्यावर तुम्हाला न्यू अकाउंटमध्ये जाऊन तुमचं युजर नेम, नाव, पासवर्ड, ई-मेल आयडी भरावं लागतं. त्यानंतर तुमचा अकाउंट तयार होतो. यावेळी सराहाची तुम्हाला युनिक आयडी मिळते उदाहरणार्थ, rahulkale.sarahah.com. ही लिंक तुम्ही फेसबुकवर टाकल्यास जे या अॅपमध्ये रजिस्टर नाहीत ते सुद्धा या आयडीवर जाऊन तुम्हाला मेसेज पाठवू शकतात. तुमच्या मित्रांनी पाठवलेला मेसेज तर तुम्हाला दिसेल, पण तो कोणी पाठवलाय हे मात्र गुपित राहील. अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा इतरांना मेसेज पाठवू शकता.
सराहा अॅपचा उपयोग काय ?
तुम्ही पाठवलेला मेसेज तुमचं नाव नसल्यामुळे प्रायव्हेट राहतो. समोरच्या माणसाचा राग न झेलता आपलं म्हणणं सांगता येतं, त्याशिवाय दुसऱ्या कोणाला आपल्याला काही सांगायचं असेल तर आपण त्याला एक प्रकारे वाट मोकळी करून देतो.
सराहा अॅपचे नुकसान
मंडळी वरील सगळे फायदे लक्षात घेतले तरी याची दुसरी बाजू म्हणजे कोणतीही व्यक्ती नको ते शब्द वापरून आपल्याला मेसेज करू शकते. तसेच यावर आपली ओळख लपलेली असल्याने सर्वात जास्त टार्गेट होणार तो म्हणजे महिला वर्ग. अनोळख्या मुलींना मेसेज करत राहणे तेही फेक अकाऊन्टमधून मेसेजेस पाठवणे असे फेसबुकवर होणारे प्रकार इथेही झाले आहेत आणि पुढेही होऊ शकतात. यावर तुम्ही प्रायव्हेसी सेटिंग मध्ये ‘Appear in search’ आणि ‘Allow Anonymous People To Post’ हे दोन पर्याय निवडू शकता
सराहा बनवण्यामागचं डोकं कोणाचं ?
सौदी अरेबियामधल्या ‘झई अल-अबिदीन तौफिक’ नावाच्या डेव्हलपरने “सराहा” तयार केला आहे. फेब्रुवारीत सराहा नावाची वेबसाईट त्याने तयार केली पण नंतर त्याच्या लक्षात आलं की याचा अॅप जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे पुढे जूनमध्येच सराहाचा अॅप ‘अॅप स्टोअर’ आणि ‘गुगल प्ले स्टोअर’ वर आलं आणि त्याचं म्हणणं खरं ठरलं. काहीच महिन्यात सराहा लोकांमध्ये गाजू लागलं. आतापर्यंत ५० लाख लोकांना सराहा डाऊनलोड केला आहे.
यातल्या प्रायव्हसी मुळेच सराहा सध्या लोकांना आवडतंय. पण यात अजूनही नवे काही फिचर आणले नाहीत तर लोकांना याचाही काही दिवसात कंटाळा येण्याची शक्यता आहे.

