मंडळी, गेली २ वर्ष विजय मल्या आणि नीरव मोदी यांच्या सारख्या १० ते ११ हजार कोटी घेऊन पळालेल्या लफंग्यांच्या बातम्या आपण चवीचवीने वाचत होतो. याच दरम्यान एक ५० हजार कोटीचा घोटाळा अगदी आपल्या डोळ्या देखत घडला. हा ५०,००० कोटींचा डल्ला मारणारी माणसं उच्चशिक्षित, अर्थक्षेत्रामधली मान्यवर होती. एका शिस्तबद्ध कॉर्पोरेट स्टाईलने घातलेला दरोडा कधीच वर्तमानपत्राच्या मथळ्यामध्ये झळकला नाही. हा घोटाळा घडला हे निश्चित, पण आजच्या तारखेसही आरोपी कोण ? आरोपी किती ? त्यांचे मदतगार कोण ? या प्रश्नांची उत्तरं सरकारला सापडलेली नाहीत.
आता इतकं सांगूनही अजूनही तुमच्या लक्षात आलं नसेल की आम्ही नक्की कोणत्या स्कॅमबद्दल बोलत आहोत. तर, मंडळी हा स्कॅम म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजारात घडलेला “को-लोकेशन स्कॅम” आहे.
आज या स्कॅमची सगळी माहिती आम्ही तुमच्या समोर सहज समजेल अशा भाषेत मांडत आहोत. तत्पूर्वी काही तांत्रिक शब्दांचा अर्थ समजून घेणे अत्यावश्यक आहे.







