कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट अजूनही लोकांना बेचैन करत आहे. कोरोनापासून मुक्ती मिळवण्याचा सध्याचा घडीला दिसत असलेला एकमेव मार्ग म्हणजे अधिकाधिक लसीकरण करणे. भारतात मात्र लसी मिळवण्यासाठी लोकांना प्रचंड प्रयत्न करावे लागत आहेत. १८ वर्षांवरील लोकांना लस मिळेल अशी घोषणा तर झाली मात्र प्रत्यक्षात लस मिळेना. एखाद्याला कोविन ऍपवर स्लॉट बुक झाला की लॉटरी लागल्यागत आनंद होतोय.
भारतात अशी परिस्थिती आहे मात्र या बाबतीत अमेरिकेतील नागरिकांची चांदी झालेली आहे. त्या ठिकाणी लसीकरणात लोकांनी सहभागी व्हावे यासाठी चक्क बक्षिसे घोषित करण्यात आली आहेत. लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्यांपैकी काहींना लॉटरी पद्धतीने बक्षिसे देण्याची घोषणा अमेरिकेतील एक राज्य ओहायोचे गव्हर्नर माईक डेव्हीन यांनी केली होती.



