नाही नाही म्हणता माणूस कधी कुठल्या व्यसनाच्या आहारी जाईल सांगता येत नाही. दारू, सिगारेट, तंबाखू अशा अंमली पदार्थासोबतच या व्यसनाच्या यादीत आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे, मोबाइल गेम.
तैवान मधील एक आजोबा शेन सॅन-युआन यांना पोकेमॉन या खेळाचे प्रचंड वेड आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, या आजोबाकडे चक्क ७२ फोन आहेत ज्यावरून हे एकाच वेळी पोकेमॉन खेळतात. विशेष म्हणजे यांच्या सायकलच्या पुढच्या बाजूला मोराच्या पिसाऱ्याच्या आकाराचे एक स्टँड बसवले आहे. जसे आपल्याकडे जत्रेत फुगेवाले खेळणी घेऊन फिरतात अगदी तसेच. या आजोबांचा फोटो पाहिल्यास असेच वाटेल की हे मोबाइल फोन विकण्यासाठीच घेऊन जात आहेत की काय. या स्टँडवर हे सगळे मोबाइल ठेऊन ते हा पोकेमॉन शोधत असतात. खरे तर ७१ वर्षांच्या या आजोबांना ‘पोकेमॉन ग्रँडपा’ म्हणूनच ओळखले जाते.


