पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजे काय ? चेक पेमेंटचे नव्या वर्षातील नवे नियम समजून घ्या !!

लिस्टिकल
पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजे काय ? चेक पेमेंटचे नव्या वर्षातील नवे नियम समजून घ्या !!

आजकाल आर्थिक व्यवहार बऱ्याच पद्धतीने केले जातात. आपण साधारण तीन पद्धतीत व्यवहार करतो: रोख, डिजिटल आणि धनादेश म्हणजेच चेकद्वारे. सगळ्यात सुरक्षित पद्धत कुठली हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यात आपण दररोज आर्थिक फसवणुकीच्या बातम्या ऐकतच असतो. अर्थतज्ञांनुसार आताच्या कोरोना संकटामध्ये बँकिंग क्षेत्रातील घोटाळे (Banking Fraud) मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने १ जानेवारीपासून नवीन नियम आणले आहेत. काय आहेत ते नियम आज जाणून घेऊयात.

कॅशलेस व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात चेक पेमेंटचा वापर केला जातो. सामान्यतः मोठ्या रकमेचे सगळे व्यवहार चेकद्वारेच केले जातात. पण सर्वात सुरक्षित वाटणाऱ्या चेक व्यवहारातही अनेक घोटाळे उघड होत आहेत. अनेक ग्राहक या फसवणुकीला बळी पडत आहेत. अशाच ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) १ जानेवारी २०२१ पासून धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम ('सकारात्मक वेतन प्रणाली') लागू करणार आहे. यामुळे नवीन वर्षात चेक (Cheque) पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केले जाणार आहेत. खोट्या चेकद्वारे होणारी फसवणूक आता टळू शकते यासाठी हे बदल आवश्यक आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे.

आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास यांनी ऑगस्टमध्ये MPC च्या बैठकीत ही घोषणा केली होती. याचा प्रमुख उद्देश चेकचा दुरुपयोग करणाऱ्यांना रोखणे हा आहे.

पॉझिटिव्ह पे सिस्टम काय आहे?

पॉझिटिव्ह पे सिस्टम काय आहे?

पॉझिटिव्ह पे सिस्टम (प्रणाली)अंतर्गत धनादेश देणाऱ्या व्यक्तीला धनादेशाचा तपशील बँकेत पाठवणे गरजेचे आहे. धनादेश देणाऱ्याला बँकेला चेकची तारीख, लाभार्थ्याचे नाव, देयकाची रक्कम इत्यादी तपशील इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही सांगावी लागणार आहे. सध्या आपण हे तपशील फक्त डिपॉझिट स्लीपमध्ये भरतो. या नव्या सिस्टममध्ये मात्र ५०,००० हून अधिकच्या रकमांसाठी दुसऱ्यांदा धनादेशाची तारीख, लाभार्थ्याचे नाव, देयकाची रक्कम व चेकचा फोटो ही माहिती पुन्हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सांगावी लागेल. म्हणजेच रि-कन्फर्म करावं लागेल. त्याने काय होईल? दिलेल्या धनादेशाची दोनदा पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन होऊन व्यवहार अधिक सुरक्षित होईल.

नव्या प्रणालीमध्ये सुरक्षितता नक्की कशी साधली जाईल?

नव्या प्रणालीमध्ये सुरक्षितता नक्की कशी साधली जाईल?

धनादेश देणारी व्यक्ती SMS, मोबाइल ॲप, इंटरनेट बँकिंग किंवा ATM यांतल्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून धनादेशचा तपशील देऊ शकते. प्रत्यक्ष धनादेश व इलेक्ट्रॉनिक तपशीलद्वारे दिलेल्या माहितीत तफावत आढळल्यास CTS( Cheque Truncation System) ही प्रणाली दोन्ही बँकांना म्हणजे ज्या बँकेचा चेक आहे व ज्या बँकेत जमा केला गेला ती या दोहोंना सूचित करेल. देशात ८०% धनादेशाने केले जाणारे व्यवहार या प्रणालीमुळे सुरक्षित होतील असे RBI चे म्हणणे आहे.

हा नियम सर्वाना अनिवार्य आहे काय?

हा नियम सर्वाना अनिवार्य आहे काय?

सुरक्षितेसाठी RBI ने हा नियम केला असला तरी या सुविधेचा लाभ घेण्याचा निर्णय पूर्णपणे हा खातेधारकांचा असेल. ५०,००० वरील धनादेशाच्या रकमेवर ज्यांना ही सुविधा हवी असेल ते घेऊ शकतात. पण धनादेश रक्कम ५,००,०००हून अधिक असेल तर हे नियम बंधनकारक असू शकतात.

नुकतीच रिझर्व्ह बँकेने रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटची (RTGS) सुविधा 24 तास म्हणजेच प्रत्येकवेळी उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. आताची ही नवी पॉझिटिव्ह पे सिस्टम १ जानेवारीला सुरू झाल्यावर तिच्याबद्दल आणखी अनेक गोष्टी समजून घेता येतील. तुम्हाला काय वाटतं?

आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी ही सिस्टिम नक्की वापरा आणि हा लेख शेअर करण्यास विसरू नका.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे