पब्जीला भारतात परत आणण्यासाठी पब्जीच्या निर्मात्यांनी काय केलंय? हा नवीन गेम पाहिला का?

लिस्टिकल
पब्जीला भारतात परत आणण्यासाठी पब्जीच्या निर्मात्यांनी काय केलंय? हा नवीन गेम पाहिला का?

सध्या व्हिडीओ गेम्सला चांगले दिवस आले आहेत. पब्जी या व्हिडीओ गेमने ज्या पद्धतीने भारतात धुमाकूळ घातला होता, त्यावरून या गोष्टीचा अंदाजा येऊ शकतो. आजवर सर्वात जास्त चर्चिला गेलेला हा व्हिडीओ गेम आहे. म्हणूनच बंदी येऊन देखील या गेमचे आकर्षण काय संपलेले नाही. बिचारे पब्जीप्रेमी चातकाप्रमाणे पब्जी परत येईल याची वाट पाहत आहेत. नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार लवकरच त्यांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला वाटलं असेल की जुना पब्जी परत येतोय, पण खरं तर त्याच्या जागी बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया हा नवीन गेम येणार आहे. पब्जी मोबाईल गेम बनवणाऱ्या साऊथ कोरियाच्या क्राफ्टन कंपनीनेच हा गेम तयार केला आहे. हा नवाकोरा गेम आधीच्या गेमपेक्षा अधिक फीचर्सने भरलेला असणार आहे. यात एक्सक्लुजीव इन गेम इव्हेंट सारखे नवे आऊटफिट फिचर सोबत AAA मल्टीप्लेयर गेमिंगचा अनुभव घेता येणार आहे.

बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया आपल्या स्वतःच्या इकोस्पोर्ट सिस्टीमसोबत येणार आहे. ज्यात टूर्नामेंट आणि लीग देखील सामील असतील. क्राफ्टन कंपनीने या नव्या गेमची फक्त घोषणा केली नाही, तर सोबत एक टीजर देखील रिलीज केला आहे. तो बघून पब्जीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 

क्राफ्टनच्या म्हणण्यानुसार हा नवा गेम भारतात रिलीज होण्याआधी प्री रजिस्ट्रेशनसाठी देखील उपलब्ध असेल. हा गेम भारतात वेगळ्या पद्धतीने लाँच केला जाणार आहे. या गेमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या गेममध्ये तिरंगा थीम असणार आहे. त्याचबरोबर कंपनीने दावा केला आहे की, या गेमचे डेटा कलेक्शन हे युझर्सच्या सेफ्टीसाठी सुरक्षित ठेवले जातील.

सुरुवातीला क्राफ्टन कंपनीने पब्जीवर आलेली बंदी उठवण्याचा प्रचंड प्रयत्न करून बघितला, पण यश हाती लागत नाही हे दिसल्यावर त्यांनी नवीन शक्कल लढवत पब्जीची कॉपी मार्केटमध्ये घेऊन आले. सध्या हा गेम कुठल्या तारखेला येईल हे निश्चित नसले तरी पब्जी प्रेमींमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे.